बेळगाव लाईव्ह :प्रादेशिक सेनेच्यावतीने बेळगावमध्ये राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या परगाव, परराज्यातील उमेदवारांची होणारी खाण्यापिण्याची गैरसोय लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावतर्फे आज मंगळवारी सकाळी त्यांच्यासाठी पुलाव व पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
प्रादेशिक सेनेच्यावतीने कॅम्प बेळगाव येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूल नजिकच्या मैदानावर गेल्या 15 नोव्हेंबरपासून येत्या 1 डिसेंबरपर्यंत 2025 भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रादेशिक सेनेच्या बेळगाव येथील टीए बटालियनतर्फे घेण्यात येत असलेल्या या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसार प्रत्येक राज्यातील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. त्यामुळे या भरतीसाठी देशाच्या विविध भागातील युवा उमेदवार सध्या बेळगावमध्ये दाखल होत आहेत.
परगाव, परराज्यातून येणाऱ्या या उमेदवारांची पोटापाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावतर्फे आज मंगळवारी सकाळी त्यांच्यासाठी पुलाव आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. या उपक्रमासाठी भरती स्थळांच्या परिसरात स्टॉल मांडण्यात आले होते. पुलाव आणि पाण्याचा लाभ घेण्यासाठी या स्टॉल्सवर भरतीसाठी आलेल्या युवकांच्या रांगा लागल्या होत्या. शेकडो उमेदवारांनी सदर उपक्रमाचा लाभ घेऊन रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावला धन्यवाद दिले.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर रो. डी. बी. पाटील यांनी सांगितले की, बेळगावातील भरती प्रक्रियेसाठी परगाव परराज्यातून मोठ्या संख्येने युवक येत असतात या युवकांची या ठिकाणी जेवण खाण्याची गैरसोय होते हे लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावच्यावतीने आम्ही या ठिकाणी 3 ते 3.5 हजार युवकांकरिता पुलाव आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
या पद्धतीचे उपक्रम रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम सातत्याने राबवत असते. थोडक्यात जिथे गरज आहे तिथे रोटरी वेणुग्राम पोहोचते, असे मला अभिमानाने सांगावेसे वाटते, असे डी. बी. पाटील शेवटी म्हणाले. उपरोक्त उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावचे अध्यक्ष रो. शशिकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी लोकेश होंगल, राजेश तळेगाव, डी. बी. पाटील, संजीव देशपांडे, कल्लाप्पा तवनोजी, महेश अनगोळकर, चंद्रकांत राजमाने यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.





