बेळगाव लाईव्ह :कंग्राळ गल्ली परिसरातील गटारातून काढलेली गाळ-माती आणि वाळू वापरून सरदार मैदानालगतच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा प्रश्न आता चांगलाच चर्चेत आला आहे. महापालिकेकडून खड्डे बुजवण्याच्या नावाखाली हा तकलादू प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सरदार मैदानाजवळील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब असून खड्ड्यांमुळे पादचारी आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही योग्य पॅचवर्क न करता पालिका कर्मचारी केवळ तात्पुरती “जुगाड” पद्धती अवलंबताना दिसत आहेत.
डांबरीकरण किंवा मजबूत खडीमातीऐवजी थेट गटारातील गाळ, माती आणि वाळू खड्ड्यांत टाकली जात असल्याने हा उपाय काही तासांतच धुळीस मिळेल, असा नागरिकांचा सूर आहे.
या प्रकारामुळे स्वच्छतेचा मुद्दाही निर्माण झाला असून परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता वाढण्याची शक्यता आहे. “रस्त्याची योग्य दुरुस्ती न करता गाळमाती टाकून खड्डे बुजवणे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेशी थट्टा आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक रहिवाशांनी दिली.
नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर आता महापालिका आयुक्तांनी तात्काळ लक्ष देऊन या रस्त्याचे दर्जेदार पॅचवर्क करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.





