बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या सीमा संघर्षाची जाज्वल्य परंपरा घडवणाऱ्या आणि 1956 पासून मराठी भाषिकांच्या हक्कांच्या आंदोलनात सक्रिय राहिलेल्या सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सीमा लढ्यातील एक अनुभवी, समर्पित, लढवय्या आवाज कायमचा शांत झाला आहे.
रामा शिंदोळकर हे अनेक मोर्चे, सत्याग्रह आणि आंदोलनांचे सक्रिय सहभागी होते. बेळगावपुरतेच नव्हे तर कोल्हापूर, मुंबईसह विविध ठिकाणी झालेल्या सीमा आंदोलनातही त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली. आंदोलकांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक वेळा कारावासही भोगला, परंतु संघर्षाची ज्योत कधीच मंद पडू दिली नाही.दरवर्षी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत नेहमी पुढे असायचे.
“सीमा लढ्याचा एक दिशादर्शक झगमगता तारा हरपला; त्यांच्या जिद्दीने हजारो तरुणांमध्ये लढाऊ प्रेरणा निर्माण केली.” अशी भावना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा आप्त परिवार आहे.
शनिवार, सकाळी 11 वाजता सदाशिव नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.सामाजिक कार्यकर्ते बळवंत शिंदोळकर यांचे ते वडील होते.

बेळगावची सीमा भूमी त्यांच्या बलिदानाची साक्ष ठेवेल — संघर्षाचे हे तेज उजळत राहील.
बेळगाव लाईव्हतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹



