बेळगाव लाईव्ह :घरावर काढलेल्या कर्जाच्या परतफेडीची जबरदस्ती व घरावर नोटीस लावून गावभर घराच्या लिलावाचा गाजावाजा करून कडोली येथील सातेरी होन्नाप्पा रूटकुटे या शेतकऱ्याची मानहानी करणाऱ्या आणि त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मण्णूरच्या मार्कंडेय सहकारी सोसायटीवर कारवाई करावी. तसेच रूटकुटे यांचे कर्ज माफ करण्याबरोबरच यांच्या घराच्या लिलावाची नोटीस तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेच्या नेतृत्वाखाली कडोली येथील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.
कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेचे नेते आप्पासाहेब देसाई बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे, सुभाष धायगोंडे आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या धरणे आंदोलनात मयत शेतकरी सातेरी होन्नाप्पा रूटकुटे यांचे कुटुंबीयांसह गावातील शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या सर्वांनी मयत शेतकऱ्याला प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करत जोरदार निदर्शने केली. यावेळी शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांनी मयत शेतकरी सातेरी होन्नाप्पा रूटकुटे यांच्यावर मार्कंडेय सहकारी सोसायटी मण्णूरने केलेला अन्याय आणि त्या संदर्भातील मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेले निवेदन सादर केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना मयत सातेरी रूटकुटे यांच्या मुलाने सांगितले की, माझ्या वडिलांनी मार्कंडेय सोसायटी मधून आमच्या घरावर 12 लाखांचे कर्ज काढले होते. त्यापैकी 4 लाख रुपयांची परतफेड केल्यानंतर मध्यंतरी शेतीमध्ये नुकसान झाल्यामुळे कर्जाची परतफेड करण्यास विलंब झाला होता.
कर्जाची परतफेड करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 ही होती. मात्र तत्पूर्वीच सोसायटीच्या लोकांनी कर्जफेडीचा तगादा लावून आम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यांनी गेल्या 23 तारखेला आमच्या घराचे मोजमाप घेऊन माझ्या वडिलांवर मानसिक दबाव टाकला.
एवढे करून न थांबता 25 तारखेला घरावर लिलावाची नोटीस लावून संपूर्ण गावात बॅनर लावून लिलावाचा गाजावाजा केला. या पद्धतीने झालेली आपली मानसानी सहन न झाल्यामुळे माझ्या वडिलांनी गळफास लावून आपले जीवन संपवले.


