बेळगाव लाईव्ह ; नोव्हेंबर रोजी जगभरात ‘ऑल सोल्स डे’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने रविवारी बेळगाव आणि परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी आपल्या कुटुंबातील दिवंगत सदस्यांना तसेच नातेवाईक व जिवलग व्यक्तींना स्मरून श्रद्धांजली अर्पण केली.
जरी स्मशानभूमी फार पवित्र मानली जात नसली तरी ख्रिस्ती धर्मानुसार आपल्या कुटुंबीयांच्या आत्म्यांचे पवित्रत्व आणि त्यांचे आशीर्वाद यावर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे या दिवशी त्यांची दफन स्थळे फुलांनी सजवून विशेष प्रार्थना अर्पण केल्या जातात.
शहरातील विविध ख्रिस्ती ख्रिस्ती दफनभूमीं मध्ये प्रार्थनासेवांचे आयोजन करण्यात आले होते. गोल्फ कोर्सजवळील, शाहपूरमधील तसेच इतर भागांतील दफनभूमींमध्ये विशेष प्रार्थना करण्यात आल्या.
गोल्फ कोर्सजवळील जुन्या स्मशानभूमीत झालेल्या प्रार्थना सेवेत मुख्य याजक म्हणून रेव्ह. फा. विजय मेंडिथ यांनी सेवा बजावली. त्यांच्यासोबत फा. नेल्सन पिंटो, फा. मायकेल फर्नांडिस, फा. अल्बर्ट डिसोझा, फा. राजेंद्र प्रसाद आणि फा. डेनिस रॉड्रिग्स सहभागी झाले होते. आपल्या प्रवचनात फा. सिरिल ब्रॅग्स यांनी उपस्थितांना पृथ्वीवरील जीवन हे तात्पुरते असल्याची जाणीव करून दिली. “आपण स्मशानभूमीत प्रार्थना करत असताना दिवंगत आत्मे आपल्याला स्मरण करून देतात की उद्या आपलीही पाळी येईल. त्यामुळे चांगल्या कर्मांद्वारे आणि प्रार्थनेद्वारे आपण नेहमी मृत्यूसाठी सज्ज राहिले पाहिजे, कारण मृत्यू हा प्रत्येकासाठी अटळ आहे,” असे त्यांनी सांगितले.
शहराच्या विविध भागांतून लोक जुन्या स्मशानभूमी तसेच ब्रिटिश स्मशानभूमीत मोठ्या संख्येने जमले होते. प्रार्थनासेवा संपल्यानंतर कुटुंबीयांनी आपल्या प्रियजनांच्या कबरींवर मेणबत्त्या लावल्या आणि याजकांनी त्यांना आशीर्वाद दिला.


