बेळगाव लाईव्ह : बेळगावचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट दिली.
त्यांनी प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचे संगोपन आणि काळजी याबद्दल पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
बेळगावमधील प्राणिसंग्रहालयात ३१ काळवीट आजारामुळे मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मंत्र्यांनी मंगळवारी प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन अधिकारी आणि डॉक्टरांशी चर्चा केली.
काळवीटांमध्ये आलेला हा आजार इतर प्राण्यांना पसरण्याची शक्यता आहे का, याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कोणतीही शक्यता असल्यास तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. हा आजार इतर प्राण्यांवर परिणाम करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना स्पष्ट केले.
बेंगळुरूहून आलेल्या अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने प्राणिसंग्रहालयात काळवीटांवर उपचार केले आहेत. या आजाराबद्दल प्रयोगशाळेकडून अहवाल देखील घेण्यात आला आहे. सध्या असलेले वाघ, सिंह आणि इतर प्राण्यांवर काटेकोर लक्ष ठेवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना सांगितले. हा आजार वाढू नये म्हणून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत आणि रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी बेळगावचे एसीएफ नागराज बाळेहूसूर, कर्नाटक प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुनील पनवार, मंजुनाथ चव्हाण, डीएफओ क्रांती एन.ई., डॉ. प्रयाग आणि प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी उपस्थित होते.


