बेळगाव लाईव्ह :बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये माध्यान आहारांतर्गत पिकलेल्या केळ्यांऐवजी अर्धवट पिकलेली कच्ची केळी वितरित केली जात असल्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडत असून शिक्षण खात्याने याकडे तात्काळ लक्ष देण्याची जोरदार मागणी पालकवर्गांकडून केली जात आहे.
सरकार योजनेचा भाग म्हणून सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे सरकारी प्राथमिक शाळेतील मुला -मुलींसाठी गेल्या बऱ्याच वर्षापासून मध्यान आहार योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत सध्या अन्य अन्नपदार्थांसोबत विद्यार्थी -विद्यार्थिनींना केळ्यांचे वाटप केले जात आहे.
तथापि या केळ्यांपैकी बहुतांश केळी अर्धीकच्ची असल्यामुळे ती खाऊन मुलांच्या तब्येती बिघडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शालेय मुलांच्या हितासाठी असणारा सरकारचा मध्यान आहार या पद्धतीने अहितकारक ठरत असल्यामुळे पालकवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
तरी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याद्वारे मुलांना चांगली पिकलेली केळी मिळण्याची सोय करावी.
त्याचप्रमाणे शिक्षण खात्याकडून पुरवठा करण्यात येणारा मध्यान आहार योग्य आहे की नाही? याची शहानिशा तो ताब्यात घेणाऱ्या शाळांच्या संबंधित प्रभारी मुख्याध्यापक अथवा शिक्षकांनी घ्यावी. त्याचप्रमाणे शाळा सुधारणा समितीने (एसडीएमसी) देखील या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी पालकवर्ग व शिक्षण प्रेमींकडून केली जात आहे.


