बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील महांतेश नगरमधून चोरीला गेलेल्या एका क्रेटा कारसह आंतरराज्य आरोपीला पकडण्यात माळमारुती पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले आहे. या आरोपीकडून ७ लाख ७५ हजार रुपये किमतीची चोरीची कार जप्त करण्यात आली आहे.
०२ नोव्हेंबर २०२५ रोजी महांतेश नगर, बेळगाव येथे क्रेटा कार चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरीचा तपास करण्यासाठी मार्केट उपविभागाचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.
तपासादरम्यान आंतरराज्य आरोपी वीरा दुर्गाप्रसाद (४७, रा. एलूरू, आंध्र प्रदेश) हा हैदराबादमधील पेद्दंबरपेठ, हयात नगर येथे चोरीच्या क्रेटा कारसह पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आणि त्याच्या ताब्यातून सुमारे ७,७५,००० रुपये किमतीची क्रेटा कार जप्त केली.
या आरोपीला त्वरित न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, या आरोपीसोबत कार चोरी करण्यासाठी बेळगावला आलेला त्याचा मित्र संगेपू चक्रधर (रा. हयात नगर, हैदराबाद) हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
या संपूर्ण कारवाईत पीएसआय होनप्पा तळवार आणि पीएसआय पी. एम. मोहिते यांच्यासह पोलीस कर्मचारी बी. एफ. बस्तवाड, अरुण कांबळे, जगन्नाथ भोसले, बी. एम. कल्लप्पनवर, के. बी. गौराणी, सी. जे. चिन्नप्पागोळ, सी. आय. चिगरी आणि महेश वडेयर यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.


