बेळगाव लाईव्ह : खानापूर शहरातील बुरुड गल्ली येथील मेदर समाजाच्या श्री लक्ष्मी मंदिरात झालेल्या मोठ्या चोरीची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी श्री लक्ष्मी देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांचे दागिने लांबविल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे खानापूर शहरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या समोरील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला आणि देवीच्या मूर्तीवरील तसेच मंदिरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला. सकाळी मंदिराचा दरवाजा उघडल्यावर ही चोरी उघडकीस आली.
चोरट्यांनी केलेल्या या धाडीत सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने (अंदाजे ₹३.५० लाख) आणि अर्धा किलो चांदीचे दागिने (अंदाजे ₹८०,०००) असा एकूण साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये देवीचे गळ्यातील चेन, किरीट (मुकुट), कमरपट्टा, पादुका, तोडे, ताट, तांब्या आणि इतर पूजेच्या वस्तूंचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक पाहणी केली. पोलिसांनी ठसेतज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्याची तयारी सुरू केली आहे, जेणेकरून चोरट्यांचा माग काढता येईल.
या वेळी लक्ष्मी यात्रा समितीचे अध्यक्ष नामदेव गुरव, सदस्य कृष्णा कुंभार, राजेश देसाई, चंबांना होसमणी, तसेच मेदर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अनिल बुरुड, पंचमंडळी आणि मंदिराचे पुजारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि चोरट्यांना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सध्या खानापूर पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. या चोरीच्या घटनेने लक्ष्मी मंदिर परिसरातील श्रद्धाळू भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.




