बेळगाव लाईव्ह : नाथ पै चौक, शहापूर बेळगाव येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात आज बुधवारी श्री काळभैरवनाथ जयंती हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावात साजरी करण्यात आली.
श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी होम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
त्यानंतर दुपारी महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात झाली. या महाप्रसादाचा शहापूर, खासबाग, वडगाव व बेळगाव शहरातील हजारो भक्तांनी लाभ घेतला. श्री काळभैरव जन्मोत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला.
श्री काळभैरव जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. श्री काळभैरवनाथ दर्शनासाठी आज जयंती दिवशी भाविकांची मंदिरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. श्री काळभैरवनाथ जयंती साजरी करण्यासाठी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर जयंती उत्सव आणि श्री काळभैरवनाथ मंदिरासंदर्भात पत्रकार व मंदिर व्यवस्थापन मंडळाचे सल्लागार श्रीकांत काकतीकर यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना मंदिराविषयी थोडक्यात माहिती दिली. सदर श्री काळभैरवनाथ मंदिर हे बेळगाव शहरच नव्हे, तर जिल्ह्यातील सर्वात पुरातन श्री काळभैरव मंदिर असल्याचे त्यांनी सांगितले. जागृत देवस्थान असल्यामुळे दरवर्षी जयंती उत्सवाला बेळगावसह आसपासच्या परिसरातील हजारो भाविक हजेरी लावत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.





