बेळगाव लाईव्ह विशेष :
बेळगावात यंदाही १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी दडपशाही झुगारून पारंपरिक पद्धतीने काळा दिवस पाळला. कर्नाटक राज्य निर्मिती दिनाच्या उत्सवात आनंद साजरा होत असताना, बेळगाव आणि सीमाभागातील मराठी बांधवांसाठी हा दिवस ‘सुतक दिन’ ठरतो. कारण, ६९ वर्षांपासून सुरू असलेली त्यांची लढाई आजही संपलेली नाही. मराठी जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा आजही तितकीच तीव्र आहे, जितकी ती १९५६ साली होती.
मराठी भाषिकांची ही झुंज केवळ सीमावाद नाही, तर अस्मितेचा प्रश्न आहे. प्रशासनाकडून येणारी दडपशाही, आंदोलनांवरील बंदी, कार्यकर्त्यांवरील गुन्हे – हे सर्व पाहूनही मराठी माणूस खचलेला नाही. उलट, प्रत्येक वर्षी काळ्या दिवशी तो रस्त्यावर उतरतो, काळे झेंडे फडकवतो, “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी बेळगावचे आकाश दणाणवतो. या कृतीतून तो केवळ विरोधच करत नाही, तर अस्तित्वाची घोषणा करतो.
काळ्या दिवशी मराठी जनतेने महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी पुन्हा एकदा जोमाने केली. आजच्या तरुण पिढीलाही या लढ्याचे गांभीर्य समजले आहे, ही गोष्ट आशादायी आहे. मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे, मराठी भाषेचा सन्मान राखणे आणि स्थानिक प्रशासनात आपले हक्क प्रस्थापित करणे, हे प्रश्न अजूनही तस्सेच आहेत.या संघर्षाकडे केवळ सीमा विवाद म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. हा संघर्ष मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचा, ओळखीचा आणि भाषेच्या अस्तित्वाचा आहे. न्यायालयीन पातळीवर लढा सुरू असला तरी, भावनिक पातळीवर मराठी समाजाने कधीच माघार घेतली नाही. ६९ वर्षांपासून चाललेला हा संघर्ष म्हणजे न थकणाऱ्या मराठी मनाची जिद्द आहे.
आज राज्योत्सवाच्या दिवशी कर्नाटक सरकार आनंद साजरा करत असते, तर सीमाभागातील मराठी जनता काळा दिवस पाळते – हे दृश्य वेदनादायी असले तरी प्रेरणादायी आहे. कारण या विरोधातही मराठी मनाचा जिवंतपणा दिसतो. ही आग, ही अस्मिता आणि हा निर्धार – हेच बेळगावच्या मराठी समाजाचे खरे बळ आहे.काळा दिवस हा फक्त शोकाचा दिवस नाही, तर स्मरणाचा दिवस आहे – त्या संघर्षाचा, त्या ओळखीचा आणि त्या आशेचा, की एक दिवस ही मराठी भूमी तिच्या मातृभूमी महाराष्ट्रात सामील होईल.

संघर्ष मराठी माणसाला नवा नाही. ६९ वर्षे मराठी जनतेने संघर्ष केलाय. बेळगावची ओळखच आता संघर्षाची नगरी झालेली आहे. अंगावरचे पोलिस अत्याचाराचे व्रण अंगावर दिमाखात घेऊन वावरणारा मराठी माणूस, त्याच्या हृदयातील मराठीची ज्योत कधीही मावळत नाही. आकाश झाकोळलेले असेल, प्रकाश दिसत नसेल, तरीही निराशेचे सावट मराठी माणसावर नाही. कारण दूर कुठेतरी मराठी माणसाच्या यशाची सतार नाजूक आवाजात किणकिणत आहे. तिचा सर्वोच्च झंकार एक दिवस हालगी काठी पडावी तसा दणाणणार आहे, यात कोणतीही शंकेची जोड नाही.
याची सुचिन्हे म्हणजे रस्त्यावर उतरलेली मोठ्या संख्येने तरुणाई, त्यांना समजलेली आपल्या भाषा-संस्कृतीची निकड, त्यांच्यात भिनलेला एल्गार आणि संघर्षाची तयारी. यातून जन्मलेली ही नवीन आशा निश्चितच मराठी भाषेचा विजय निर्माण करणारी आहे.
कर्नाटकाने राज्योत्सव साजरा केला, आणि तो साजरा करायला मराठी माणसाने कधीही आडकाठी आणली नाही. परंतु राज्योत्सव साजरा करताना कर्नाटकाला त्या उत्सवाला सांस्कृतिक स्वरूप देता आलं नाही. कर्नाटकाची सांस्कृतिक ओळख कुठेही राज्योत्सवात दिसली नाही. दिसला तो फक्त कर्णकर्कश डॉल्बीचा आवाज, धागडधिंगाणा, व्यसनाधीन तरुणाईचे अर्वाच्य हावभाव, सुंदर बेळगावला गलिच्छ करण्याची वृत्ती, जागोजागी फेकलेले कागद, दारू पिऊन केलेल्या उलट्या, चाकू हल्ले, महिलांची छेडछाड – सगळं किळसवाणं दृश्य.
कर्नाटक हा भारताचा अविभाज्य भाग आहे. कर्नाटक राज्यालाही सांस्कृतिक ओळख आहे – पण ती कुठे हरवली, हा प्रश्न कन्नड धुरिणांनी विचारावा. राज्योत्सवाच्या ठिकाणी आपलं कुटुंब घेऊन जावं असं किती कन्नड भाषिकांना वाटतं होतं? हा प्रामाणिक प्रश्न आहे. आणि या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरापुढे देखील प्रश्नचिन्ह आहे.
या उलट, मराठी भाषिकांची निषेध फेरी लोकशाहीला बळकट करणारी आणि संविधानावर विश्वास दाखवणारी होती. “आम्ही मराठी आहोत, आम्ही बेळगावकर आहोत, बेळगाव हे सांस्कृतिक गाव आहे,” हे सांगणारी नवी पिढी दिसली – हे दृश्य निश्चितच मराठी माणसाच्या संस्कृतीचे प्रतीक आहे.
केवळ ओरबाडले तर गाव आपले होत नाही; त्या गावावर निस्सीम प्रेम करावे लागते, तेव्हाच ते गाव आपले ठरते. मराठी माणसाने बेळगाववर प्रेम केले, बेळगावची सांस्कृतिकता जपली आणि बेळगाव हे मराठी माणसाचंच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.६९ वर्षे अशीच गेली नाहीत; मराठी माणूस संघर्ष करत आला आहे. पण त्याने बेळगावचे विद्रूपीकरण कधीही होऊ दिले नाही, कारण बेळगाव हे मराठी माणसाच्या अस्मितेचा केंद्रबिंदू आहे.


