कंग्राळी बी.के. मध्ये धर्मांतर प्रकरण उफाळले; ग्रामपंचायतीला घेराव

0
11
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कंग्राळी बी.के. (ता. जि. बेळगाव) येथे लोकांची दिशाभूल करून त्यांना फितवून धर्मांतर केले जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील एका विशिष्ट धर्माच्या व्यक्ती व संस्थेच्या विरोधात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त नागरिकांनी तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी आज गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीला घेराव घालून पंचायत अध्यक्ष व सदस्यांना जाब विचारला. संबंधित व्यक्ती आणि संस्थेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. गावकरी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, कंग्राळी बी.के. येथे सुमारे पाच वर्षांपूर्वी एका विशिष्ट धर्माची स्वतःला धर्मगुरू म्हणवणारी व्यक्ती वास्तव्यास आली. पत्र्याचे शेड घालून राहणाऱ्या या व्यक्तीबद्दल संशय निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी त्याला त्यावेळी ताकीद दिली होती. तथापि, त्यानंतर संबंधित व्यक्ती लोकांची दिशाभूल करून त्यांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान या व्यक्तीने गावात ‘येशू आधार केंद्र’ नावाची संस्था देखील स्थापन केली.

ही संस्था सुरू करण्यासाठी आवश्यक कागदोपत्री व्यवहार पूर्ण करण्यात ग्रामपंचायतीतील काही पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. अलीकडे या व्यक्तीचे धर्मांतराचे प्रयत्न वाढल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयात धडक देऊन घेराव घातला.

 belgaum


घेराव घालण्यापूर्वी गावकरी व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षांना आपली मागणी नमूद असलेले निवेदन सादर केले. ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, पीडीओ, सेक्रेटरी व सर्व सदस्यांना देण्यात आलेल्या या निवेदनात गावातील मरगाई नगर येथे चालू असलेल्या गैरप्रकारांवर तत्काळ निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारून ग्रामपंचायत अध्यक्षा रोहिणी बुवा यांनी संबंधित प्रकरणासंदर्भातील निर्णय येत्या सोमवारी जाहीर केला जाईल, असे आश्वासन दिले.


आंदोलनानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थानचे बेळगाव तालुका प्रमुख भरत पाटील म्हणाले की, “कंग्राळी बी.के. येथे धर्मांतराचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही आज येथे ग्रामपंचायतीला जाब विचारण्यासाठी आलो. संबंधित व्यक्तीला ग्रामपंचायतीकडून घर बांधण्यासाठी परवाना तसेच त्याच्या संस्थेची अधिकृत नोंदणी देण्यात आली आहे. परंतु बेकायदेशीर धर्मांतराचा संशय असल्यास अशा व्यक्तींची शहानिशा करूनच परवानगी द्यायला हवी होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई करून संबंधित व्यक्तीचे परवाने रद्द करावेत,” अशी मागणी त्यांनी केली.


याबाबत पुढील चार दिवसांत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत अध्यक्षांनी दिल्याची माहितीही पाटील यांनी दिली. यावेळी विविध हिंदू संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.