बेळगाव लाईव्ह : बॉलिवूडमधील ‘धूम’ चित्रपटातील खलनायक जॉन अब्राहमच्या भूमिकेतून प्रेरणा घेऊन, दिवाळीच्या सुट्टीत घराचे मालक बंगळुरूला गेले असताना घराचा दरवाजा तोडून चोरी करणाऱ्या एका आरोपीला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे.
या कारवाईत १,२८० ग्रॅम सोने आणि साडेआठ किलो चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
ते गुरुवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यमकनमर्डी गावातील विश्वनाथ दुग्गानी यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी महांतश नगर येथील सुरेश नाईक (वय ३७) या आरोपीला अटक केली आहे.
घरमालक बंगळुरूला गेल्याची माहिती निश्चित करून घरफोडी करणाऱ्या सुरेशने घराचा दरवाजा तोडला, तसेच तिजोरीचा दरवाजाही फोडला. त्याच्याकडून ८९ लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोने आणि १ लाख २५ हजार रुपये किमतीची ८.५ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

यमकनमर्डी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून एकूण १,२८० ग्रॅम सोने, ८.५ किलो चांदीचे दागिने, एक ‘थार’ कार आणि दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत. आरोपीला अटक करून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, असेही डॉ. गुळेद यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आर.बी. बसरगी, यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.





