बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सध्या रहदारीच्या समस्येने मोठ्या प्रमाणावर ग्रासलेले आहे. अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी केलेली खुदाई आणि सुरू असलेली कामे यामुळे शहरात ट्रॅफिक जामचे दृश्य दिसत आहे.
आगामी डिसेंबर महिन्यात सुरू होणारे हिवाळी अधिवेशन आणि त्या दरम्यान बंगळूरहून बेळगावला शिफ्ट होणारी राजधानी या अतिरिक्त वाहतूक ताणामुळे पुढील काही दिवसात रहदारीची समस्या अधिक तीव्र होणार आहे, हे नक्की आहे.
सध्या बेळगावात देशमुख रोडवर एल अँड टी कंपनीकडून खुदाई सुरू आहे, त्यामुळे या रस्त्यावरही सकाळपासून ट्रॅफिक जामचे चित्र पहायला मिळत होते. ही समस्या पाहत माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी खुदाई बंद करण्याची मागणी बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून केली होती.
“आधी तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिज रस्त्याचे काम पूर्ण करा, मगच देशमुख रोडकडे वळून खुदाई करा,” अशी मागणी त्यांनी केली. गुरुवारी दुपारी ही बातमी बेळगाव लाईव्हने प्रसारित केली, आणि वृत्त प्रसारित झाल्यानंतर अवघ्या तासाभरात प्रशासनाने या समस्येची दखल घेतली.
देशमुख रोड खुदाई ठिकाणी ट्राफिक पोलिस निरीक्षक बी. जे. पाटील यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतली.
यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना नेमक्या समस्येची माहिती देत सांगितले की, जोपर्यंत तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिज रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत टिळकवाडी येथील देशमुख रोडवर एल अँड टी कंपनीकडून हाती घेतलेले खुदाई आणि दुरुस्तीचे काम थांबवणे का गरजेचे आहे, हे सविस्तर स्पष्ट केले.
पोलिस अधिकाऱ्यांनी नेमकी समस्या समजून घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून समस्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
सकाळी प्रसिद्ध झालेली बातमी
तिसरे गेट ब्रिजचे काम अपूर्ण असताना देशमुख रोडवर खुदाई; वाहनचालकांचा संताप https://belgaumlive.com/2025/11/belgaum-deshmukh-road-work-should-halt-till-third-railway-gate-bridge-completion/


