बेळगाव लाईव्ह : आगामी ८ डिसेंबरपासून बेळगावात सुरू होणाऱ्या कर्नाटकी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महाअधिवेशन कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करण्याचा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.रविवारी सायंकाळी रंगुबाई पॅलेस येथे झालेल्या या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी भूषविले.
महाअधिवेशनासाठी प्रत्येक घरातून एक मराठी भाषिक सहभागी करण्याचे आवाहन
बैठकीत बोलताना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ८ डिसेंबर रोजीचा कार्यक्रम ‘महामेळावा’ नसून ‘मराठी भाषिकांचे महाअधिवेशन’ आहे. त्यामुळे सीमा भागातील प्रत्येक मराठी घरातून किमान एक प्रतिनिधी महाअधिवेशनात हजर राहावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले.
कार्यकर्त्यांनी दारोदारी जाऊन संपर्क मोहीम, सोशल मीडिया कॅम्पेन आणि स्थानिक पातळीवरील संघटनांसोबत समन्वय वाढवण्याचा मानस व्यक्त केला.
कन्नड साहित्यिक व खासदारांच्या वक्तव्यांचा निषेध
बेळगाव सीमा प्रश्न ‘संपला’ असा नेहमी दावा करणारे खासदार जगदीश शेट्टर यांच्या वक्तव्याचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे होते असा दावा करणाऱ्या य रा पाटील या कन्नड साहित्यिकाच्या वक्तव्याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला.
“शिवरायांचा इतिहास मोडून काढण्याचा प्रयत्न” — प्रकाश मरगाळे
मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले,
“छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. त्यांनी आपल्या काळात कुळदैवतासह सर्व हिंदू मंदिरे वाचवली, संरक्षण दिले. मंदिर कोणत्या जातीचे आहे याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. अशा परिस्थितीत शिवरायांना ते लिंगायत समाजाचे होते असे सांगणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असून मराठा समाजाच्या भावनांना धक्का पोहोचवणारे आहे.”
त्यांनी पुढे सवाल उपस्थित केला की, “इतिहास विपर्यास करणाऱ्या अशा वक्तव्यांवर राष्ट्रीय पक्षांतील मराठा समाजातील नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांना शांत का? त्यांनी तरी भूमिका स्पष्ट करावी.”
मरगाळे यांनी कन्नड साहित्यिकांना ‘इतिहास नीट वाचा’ असा सल्ला देत महाराष्ट्रातील इतिहासकारांनीही अशा प्रोपोगंडाविरुद्ध तथ्यांसह भूमिका मांडावी, अशी मागणी केली.

युवा पिढीचा उत्स्फूर्त सहभाग
बैठकीदरम्यान युवा कार्यकर्त्यांनी महाअधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करत, सोशल मीडिया, अशा विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क उभा करण्याचे विचार मांडले.
बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे, रणजीत चव्हाण पाटील, रमेश पावले,सागर पाटील बाबू कोले, विनोद आंबेवाडीकर, श्रीकांत कदम, अंकुश केसरकर आदी उपस्थित होते.


