बेळगाव लाईव्ह : पुढील महिन्यात १ ते ५ डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी यात्रोत्सव पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेतर्फे बेळगाव जिल्हा प्रशासनाला यात्रेकरूंसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी बेळगावचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. निवेदनात यात्रेदरम्यान महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.
संघटनेने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात — यात्रेकरूंसाठी पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता, पथदीप, पार्किंगची व्यवस्था आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच महिला पोलीस तैनात करण्याची मागणी केली आहे. तसेच देवी दर्शनासाठी मंदिराचे चारही दरवाजे खुले ठेवावेत आणि मराठी-इंग्रजी भाषेतील माहितीफलक लावावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
यात्रेदरम्यान कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील बस व अवजड वाहने डोंगरावर सहज जाऊ शकतील, अशी परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. पौर्णिमा यात्रेदरम्यान तीन लाखांहून अधिक भाविक सौंदत्ती डोंगरावर उपस्थित असतात, त्यामुळे पोलीस प्रशासनाने चोरी, गोंधळ व अन्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, असेही संघटनेने नमूद केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे शिरस्तेदार श्रीशैल प्रगती यांनी या मागण्यांची दखल घेत सांगितले की, “लवकरच रेणुका देवी यात्रा संदर्भात विशेष बैठक आयोजित केली जाणार असून कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या मागण्यांवर विचार केला जाईल.”
दरम्यान, जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनीही यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या सुरळीततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती दिली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अच्युत साळोखे, कार्याध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष सरदार जाधव, सरचिटणीस तानाजी सावंत, गजानन विभुते, मोहन साळोखे, आनंदराव पाटील, युवराज मुळे, दयानंद घबाडे, लता सूर्यवंशी, शालिनी सरनाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.


