बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात बसून अमेरिकेतील नागरिकांना फसवणुकीचे फोन करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय फसवणूक कॉल सेंटरचा बेळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३३ लोकांना अटक केली असून, हे आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या संदर्भात बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
बेळगावमध्ये एक कॉल सेंटर कार्यरत असल्याची विश्वसनीय माहिती आणि एका निनावी अर्जाच्या आधारे, डीसीपी नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखालील एसीपी रघु, माळमारुतीचे सीपीआय गड्डेकर, एपीएमसीचे पीआय उस्मान औटी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्वरित कारवाई केली. बेळगाव शहरातील बॉक्साईट रोडवरील कुमार हॉलमध्ये चालणाऱ्या या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला.
यावेळी, तिथे आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे कॉल सेंटर चालत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३७ लॅपटॉप आणि ३७ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. विविध राज्यांमधील एकूण ३३ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. हे आरोपी अमेरिकेतील नागरिकांची माहिती मिळवून, त्यांना फसवत होते आणि त्यांची पैशांची फसवणूक करत होते. या रॅकेटचे मुख्य सूत्रधार गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जाळे फेकले आहे.

पोलीस आयुक्त बोरसे यांनी सांगितले की, या फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या मुख्य आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. पोलीस महासंचालकांना विनंती करून सीआयडीच्या मदतीने या फसवणुकीचे बळी ठरलेल्या अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांचे जबाब नोंदवले जातील आणि त्यानंतर दोषारोपपत्र दाखल केले जाईल.
या कॉल सेंटरमध्ये एकही स्थानिक व्यक्ती सहभागी नाही. बाहेरून येऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारासोबत राहण्याची सोयही पुरवली जात होती. मार्च महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात असल्याची माहिती आहे. या सर्व पैलूंचा कसून तपास केला जाईल, असेही आयुक्त बोरसे यांनी स्पष्ट केले.




