बेळगाव लाईव्ह : बेळगावातील ईएसआय हॉस्पिटलच्या रखडलेल्या पुनर्निर्माणाच्या कामावर शनिवारी झालेल्या के.डी.पी. बैठकीत खासदार-आमदारांनी थेट प्रश्न उपस्थित केले. कामाची सुरुवात तातडीने करण्याची मागणी उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी केली, तर हॉस्पिटल रिकामे झाल्यावरच नुतनीकरणाला गती मिळेल, असे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी स्पष्ट केले.
सुवर्ण विधानसौध येथे झालेल्या बैठकीला जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियांका जारकीहोळी, राज्यसभा सदस्य कडाडी, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी अधिकाऱ्यांची गैरहजेरीवर नाराजी व्यक्त करत, अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच 2023-24 मधील अनेक मंजूर योजना अद्याप अंमलात न आल्याचे निदर्शनास आणत सरकारी शाळांच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर पालकमंत्री जारकीहोळी यांनी समस्यांची यादी मागवून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, ईएसआय हॉस्पिटलच्या पुनर्निर्माणासंबंधी बोलताना आमदार असिफ सेठ यांनी नव्या इमारतीची गरज अधोरेखित केली. त्यास उत्तर देताना इराण्णा कडाडी यांनी 152 कोटींचा निधी मंजूर असून टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाल्याचे सांगितले. मात्र जुने हॉस्पिटल रिकामे न झाल्यास काम सुरू करता येणार नाही व निधी परत जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. हॉस्पिटल रिकामे होताच नूतनीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



