बेळगाव लाईव्ह :गृह खरेदीदारांना मोठा दिलासा देत कर्नाटक रेरा अर्थात कर्नाटक स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने बाजार गल्ली, खासबाग येथील अभिनंदन रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशनला बेळगावातील रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प ताब्यात घेण्याची आणि पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे संबंधित गृह खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित प्रकल्पाच्या बिल्डरचा अर्थात विकासकाचा 2022 मध्ये मृत्यूनंतर 40 टक्के अपूर्ण राहिलेला हा प्रकल्प एक वर्षापेक्षा जास्त काळ रखडला होता.
परिणामी खरेदीदारांना ताबा न देता ईएमआय भरावे लागत होते. रेराने आता असोसिएशनला उर्वरित काम पूर्ण करण्यास, सर्व आवश्यक मान्यता मिळविण्यास आणि प्राधिकरणाच्या देखरेखीखाली नियमित अनुपालन अहवाल सादर करण्यास अधिकृत केले आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी सांगितले की, सदर प्रकल्पाला रेराने परवानगी दिली असली तरी संबंधित प्रकल्पाचे शिल्लक असलेले काम रेरा पूर्ण करून देणार नसून घर मालकांनी ते पूर्ण करून घ्यावयाचे आहे आहे.
या पद्धतीचे प्रकल्प सुरू करून नंतर प्रकल्प अर्धवट पूर्ण झाला असताना बिल्डरच अस्तित्वात नसल्याची प्रकरणे बेळगावच नव्हे तर देशभरात झाली असून अशा प्रकरणात घर मालकांनाच आपली घरे बांधून घ्यावी लागली आहेत.
ताज्या प्रकरणात रेराने घरमालकांना तुम्ही पैसे दिले आहेत, त्यावर तुमचे कर्ज आहे, तेंव्हा जागेचा ताबा घेऊन काम पूर्ण करून घ्या, असे निर्देश दिले आहेत.


