बेळगाव लाईव्ह : इंडोनेशिया येथील बँटम बेटावर 11 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी बेळगावातील तिघा शरीरसौष्ठवपटूंची निवड झाली आहे. प्रशांत खनूकर, व्ही. बी. किरण आणि व्यंकटेश ताशिलदार या खेळाडूंचा पॉलीहायड्रोन फाउंडेशन तर्फे सन्मान करण्यात आला.
हॅवलॉक इंडस्ट्रीजच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात उद्योजक चिटणीस पराग चिटणीस यांनी खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला व आगामी स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सचे कार्यकारी अजित सिद्धनावर, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष एम. गंगाधर, सेक्रेटरी हेमंत हावळ, सुनील पवार आणि गणेश गुंडप उपस्थित होते.
खेळाडूंना पॉलीहायड्रोन फाउंडेशनचा मोलाचा पाठिंबा:शरीरसौष्ठव क्रीडा प्रोत्साहनासाठी पॉलीहायड्रोन फाउंडेशन गेली अनेक वर्षे विविध प्रकारे सहकार्य करत असून, बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात या संस्थेचे योगदान लक्षणीय आहे. संस्थेच्या सहकार्यामुळे बेळगावातील अनेक व्यायामपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवण्यास यश मिळवले असल्याचे क्रीडा मंडळींचे म्हणणे आहे.
जागतिक स्पर्धेकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे
आगामी स्पर्धेत बेळगावच्या या तिघा खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत असून, त्यांच्या निवडीमुळे शहराच्या क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण आहे.



