बेळगाव लाईव्ह :उत्तर कर्नाटकाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर बेळगावला प्रशासनिक शक्तिकेंद्र म्हणून घोषीत करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन उत्तर कर्नाटक विकास वेदिकेचे अध्यक्ष अशोक पूजारी यांनी केले.
शुक्रवारी बेळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत ते संवाद साधत होते.
पूजारी म्हणाले की, “उत्तर कर्नाटकाच्या विकासाबाबत आवाज उठवला की काही जण अपस्वर काढतात. मात्र आमची मागणी स्पष्ट आहे — सुवर्ण विधानसौध येथे सचिवस्तराच्या कार्यालयांचे स्थलांतर व्हावे आणि बेळगावला राज्याची दुसरी राजधानी घोषित करावी.”
त्यांनी स्पष्ट केले की उत्तर कर्नाटक वेगळे राज्य हा आमचा अजिबात हेतू नाही. “आमचा संघर्ष हा फक्त विकासासाठी आहे. आमदार राजू कागे आमच्या संघर्षाला राजकीय वळण देत आहेत, हे चुकीचे आहे,” अशी टीका त्यांनी केली.
उत्तर कर्नाटक विकसित झालाच नाही — पूजारींची खंत
“आजही सर्व आर्थिक संसाधने बेंगळुरूला केंद्रीत आहेत. उत्तर कर्नाटकालाही मोठे उद्योग उभारून रोजगारनिर्मितीची गरज आहे,” असे पूजारी यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनातच उत्तर कर्नाटकातील प्रश्नांवर ठोस चर्चा व्हावी आणि उपाययोजना जाहीर व्हाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. “तसे न झाल्यास आंदोलनाला सार्वजनिक समर्थन मागावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.पत्रकार परिषदेस सी.बी. संगोळी, रवी पाटील, निंगप्पा अम्मीनभावी, के.डी. देशपांडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.




