बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील कक्केरी रामापूर या ठिकाणी घराची भिंत कोसळल्याने एक कामगाराचा मृत्यू झाला आहे. सदर घटना आज सदर घटना आज गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामापुर गावातील फैयरोझखान, अयूबखान, देवडी यांच्या जुन्या घराचे छप्पर काढून भिंतीला पांढरं रंग देण्याचं काम सुरू असताना भींत कोसळली व दुर्दैवी अपघात घडला. भिंत कोसळल्याने विटांच्या ढिगाऱ्याखाली सापडून कामगार मोहम्मद हसीम दिलावरसाब देवडी (वय 60 वर्षे) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने कक्केरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत मोहम्मद हसीम देवडी यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. मोहम्मद हेच कुटुंबाचे प्रमुख व एकमेव कर्ते कमावते होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंब उघड्यावर आलं आहे.
या घटनेबाबत नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पीआय. एस. सी. पाटील पुढील तपास करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर अखिल कर्नाटक रयत संघ, बेंगळुरूचे राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी, तसेच किसान नेते अब्दुल अझीझ गिरियाल, अरीफ कुतुबुद्दीन पाटील, मुबारक इमामसाब कित्तूर, जाकीर मोहम्मद पाटील इत्यादींनी देवडी यांच्या घराला भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांनी सरकार, कामगार मंत्री आणि लोकप्रतिनिधींकडे या गरीब कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
शेतकरी नेत्यांनी आश्वासन दिले की, सरकारकडे निवेदन सादर करून लवकरच या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळवून दिली जाईल.


