बेळगाव लाईव्ह : बेळगाव भाग्यनगर येथील माजी नगरसेविका, आदर्श सहकारी सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा सौ. शकुंतला अनिल बिरजे यांचे गेल्या 6 ऑक्टोबर रोजी निधन झाले. आज त्यांचा तेरावा दिवस यानिमित्……
गणेशपूर गल्ली, शहापूर येथील पार्वती व शंकरराव ईराप्पा पाटील यांच्या पोटी 22 ऑगस्ट 1954 रोजी शकुंतला यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा क्रमांक15 मध्ये तर माध्यमिक शिक्षण शहापूर येथील सरस्वती गर्ल्स हायस्कूलमधून झाले. राणी पार्वतीदेवी महाविद्यालयातून वयाच्या 19 व्या वर्षीच त्यांनी बी.ए. पदवी संपादन करण्याचा मान मिळवला.
17 मे 1974 रोजी मुळचे खानापूर आणि सध्या भाग्यनगर नववा क्रॉस येथे वास्तव्यात असलेल्या अनिल दत्ताजी बिरजे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. अनिल बिरजे हे एका सामाजिक कुटुंबातून आलेले त्यामुळे त्यांनाही सामाजिक कार्याची आवड होती. त्यामुळेच सौ शकुंतला यांच्या सामाजिक कार्याला गती मिळाली. याच काळात भाग्यनगर परिसरात स्थापन झालेल्या आदर्श को ऑप. सोसायटीच्या उभारणीत त्यांनी काम केले त्यामुळेच त्या आदर्श मध्ये संचालक झाल्या.
त्यांचे कार्य पाहून तेथे त्यांची व्हाईस चेअरपर्सन म्हणून नियुक्ती झाली. आपल्याला जनसेवेची ही संधी मिळाली आहे हे लक्षात घेऊन आपल्या कारकिर्दीत त्यांनी उत्तम प्रकारे कार्य केले.
1996 मध्ये भाग्यनगर चा वार्ड महिला वार्ड म्हणून घोषित झाला. तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांना तिकीट दिले. त्यांनी निवडणूक लढवली. नागरिकांना त्यांचे कार्य माहीत होतेच त्यामुळे त्या चांगल्या मतांनी निवडून येऊन महानगरपालिकेत गेल्या.
आपल्या वार्डाच्या विकासासाठी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कार्य केले. या काळात आलेली अनेक अमिषा त्यांनी धुडकावून लावली.त्यामुळे त्या लोकादरास पात्र ठरल्या.1996 ते 2001सालापर्यंत त्या नगरसेविका असताना त्यांनी सामान्य लोकांची अनेक कामे केली. समाजसेवेत हिरिरीने भाग घेत असताना त्यांनी कधीही घराकडे दु्र्लक्ष केले नाही. पती अनिल बिरजे कामानिमित्त बाहेरदेशी असले तरी सौ.शकुंतला यांनी आपल्या तिन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. पती-पत्नींच्या दूरदृष्टीमुळे मोठी मुलगी शितल ही डेंटल सर्जन झाली. तर देविकांत व अमोलही दोन्ही मुले इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंजिनिअर झाली.
आज त्यापैकी सौ शितल ही आपल्या पती व मुलासमवेत आणि अमोल हे आपल्या पत्नी आणि मुलासमवेत अमेरिकेत कार्यरत आहेत. तर देविकांत हे बेळगावात आहेत. या तिघांनाही उत्तम असे जोडीदार मिळाले असून ते प्रगती करीत आहेत. त्यामुळेच अनेक वेळा सौ शकुंतला व अनिल हे अमेरिकेचा दौरा करतात.
नाती-गोती सांभाळून सौ. शकुंतला यांनी सर्वांना आपुलकीची आणि सन्मानाची वागणूक देऊन घराचा स्वर्ग बनविला. त्यांना बागकामाचीही फार आवड होती. त्यामुळेच मुलाप्रमाणेच झाडावरही त्या प्रेम करायच्या. अशा मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष सौ.शकुंतला अलीकडे अमेरिकेत अटलांटा येथे मुलांसमवेत होत्या व पती अनिल हे बेळगावात होते.
अशावेळी सौ शकुंतला यांना क्रूरकाळाने हिरावून नेले. योगायोग म्हणजे त्याच दिवशी सौ शकुंतला यांच्या मोठ्या जाऊ सौ अन्नपूर्णा बाळासाहेब बिरजे यांचेही खानापूर येथे वार्धक्याने निधन झाले. एकाच दिवशी त्या दोघींचे निधन झाल्याने बिरजे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दोघींच्या आत्म्यास सद्गती लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना!
-परिचित.




