बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील वाहनधारकांना खड्ड्यामुळे त्रासाचा ठरलेला तिसरा रेल्वे गेट उड्डाणपुलाचा रस्ता अखेर दुरुस्त होणार आहे आणि या दुरुस्तीला मुहूर्त देखील मिळाला आहे.
अनेक आंदोलने मोर्चे आणि निवेदने देऊन अखेर प्रशासनाने या रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता मात्र कामाला कधी सुरू होणार याची माहिती मिळाली नव्हती बेळगाव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याला देखील दुजोरा दिला असून आगामी 5 नोव्हेंबर पासून अनेक वाहन चालकांना त्रासदायक ठरलेला हा रस्ता दुरुस्त होणार आहे त्यामुळे काही प्रमाणात वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे.
तिसरे रेल्वे गेट उड्डाणपूल रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. उड्डाण पूल रस्ता दुरुस्तीसाठी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला असून दि. २ नोव्हेंबर रोजी निविदा काढण्यात येणार असून ५ नोव्हेंबरपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता नवीन बंकीपूर यांनी दिली.
तिसरे रेल्वेगेट उड्डाण पूल रस्ता दुरूस्तीसाठी दोनवेळा स्थानिकांना घेऊन माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर सामाजीक कार्यकर्ते व
पोलिसांनी रस्त्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. गेल्या आठवड्यात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनदेखील छेडण्यात आले. त्यावेळी सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले होते.
त्यावेळी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीची प्रतदेखील देण्यात आली होती. पावसामुळे दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले. रहदारी पोलिस विभागाचे एसीपी जोतिबा निकम यांच्या पुढाकाराने उड्डाणपूल रस्ता दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा हा रस्ता चर्चेत आला आहे.





