बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात ‘नोव्हेंबर क्रांती’ची चर्चा सुरू असतानाच, मंत्रिमंडळ फेररचनेच्या चर्चेने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाच्या तीन मंत्र्यांनी एका खासगी ठिकाणी आयोजित केलेली ‘डिनर मीटिंग’ राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण करत आहे.
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी ‘वन-टू-वन’ बैठक घेतली. एका खासगी अपार्टमेंटमध्ये या दोन मंत्र्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर या बैठकीला मंत्री महादेवप्पा यांनीही उपस्थिती लावली. “ही बैठक नसून, केवळ जेवणासाठी आमंत्रण होते,” असे सांगून तिन्ही मंत्री निघून गेले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अचानक ‘दुहेरी खेळी’ केली असून, मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल संकेत दिल्यानंतर येत्या सोमवारी त्यांनी मंत्र्यांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थान ‘कावेरी’ येथे होणाऱ्या या स्नेहभोजनामुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या स्नेहभोजनाच्या आयोजनाबद्दल बोलताना गृहमंत्री परमेश्वर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळात बदल करण्यासाठी हे स्नेहभोजन आयोजित केलेले नाही. आमदारांना मुख्यमंत्र्यांनी जेवणासाठी बोलावणे ही नवीन गोष्ट नाही. मुख्यमंत्री, आमदार आणि मंत्र्यांमध्ये विश्वास असतोच. “फक्त जेवण घालूनच विश्वास संपादन करायचा असतो का?” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली. “मंत्रिमंडळ फेररचना मला माहित नाही. तो पक्ष आणि मुख्यमंत्र्यांवर अवलंबून असलेला विषय आहे. मी कोणत्याही गोष्टीचा भाग होणार नाही. मला बोलावून चर्चा केल्यास मी सल्ला देईन. कोणती मदत लागेल ती करेन. याशिवाय इतर कोणतीही चर्चा करू नका,” अशी विनंती डीके शिवकुमार यांनी केली आहे.


