बेळगाव लाईव्ह: दुसऱ्याच्या दुःखाला सुखाचं अस्तर लावला तर आपल्या दुःखाची धार कमी होते, आपले अश्रू पुसायचे असतील तर दुसऱ्याच्या डोळ्यातून ओघळणारी दुखे समजून घेतली पाहिजेत. वैश्विक दुःखाला केवळ स्वार्थाची मलमपट्टी करून चालत नाही तर परोपकाराच्या पायऱ्या चढाव्या लागतात.
कुठेतरी विझत चाललेल्या जगण्याला हळुवार साद घातली तर हे जगणं परत मोहरुन येतं. या भावनेतून एखाद कुटुंब आपलं दुःख विसरून कुठे तरी सुखाच्या पायघड्या घालायला जातं त्यावेळी उभे राहते ते एक आदर्श कार्य..
बेळगाव वडगाव नाझर कॅम्प येथील ज्ञानेश्वर सायनेकर आणि कुटुंबाने असाच एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे.अभियंते ज्ञानेश्वर सायनेकर यांनी आपल्या आईच्या बाराव्या निमित्त राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.

नाझर कॅम्प वडगाव येथील रुक्मिणी सायनेकर यांचे 16 ऑक्टोबर रोजी निधन झाले होते त्यांच्या बाराव्या दिनी त्यांचे चिरंजीव आणि इतर कुटुंबीयांनी गरजू आणि असाहाय्याना मदत सामुग्री देत स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
सायनेकर कुटुंबीयांनी सेंट जोसेफ वृद्धाश्रम कॅम्प, पाथरवट समाज किल्ला तलाव यासह पिरनवाडी भागातील निराधार लोकांना ब्लँकेट साड्या चादरी इत्यादी मदतीच्या सामानाची मदत केली. या मदतीने त्या सर्व निराधार लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. यावेळी ज्ञानेश्वर सायनेकर, सुमन सुळेभावी,प्रकाश सुळेभावी यांच्यासह सायनेकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आईच्या बाराव्या दिनी स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल या कुटुंबाचे कौतुक होत आहे.





