बेळगाव लाईव्ह : जीवघेणा मांजा दोरा विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करत बेळगाव पोलिसांनी मांजा दोरा जप्त केला आहे.
बेळगाव शहरात पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या धोकादायक मांजा दोऱ्यांच्या विक्री व वापराबाबत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
हा मांजा दोरा अतिशय धोकादायक असून वाहनचालक तसेच नागरिकांच्या मानेस वा शरीराच्या इतर भागांना लागून गंभीर दुखापत होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली.या मोहिमेअंतर्गत शहरातील शहापूर टिळकवाडी पोलीस ठाणे हद्दीत अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे.
टिळकवाडी पोलीस स्थानक हद्दीत:
अनगोळ येथील स्टेशनरी दुकानाचे मालक शुभम सोन्साळकर, रा. अनगोळ यांच्या दुकानात हानिकारक मांजा दोऱ्याचे रोल विक्री करत असताना पोलिसांनी छापा टाकून 3 मांजा दोऱ्यांचे रोल जप्त केले.

शहापूर पोलीस स्थानक हद्दीत
नवी गल्लीत एक अल्पवयीन मुलगा मांजा दोरा वापरत असताना पोलिसांनी त्याच्याकडून 8 मांजा दोऱ्यांचे रोल जप्त केले.
एकूण 11 मांजा दोऱ्यांचे रोल जप्त करण्यात आले असून, संबंधित आरोपींवर कायदा कलम (K.P. Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव शहरातील सर्व दुकानदारांना पुढील काळात अशा धोकादायक मांजा दोऱ्यांची विक्री न करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच पालकांना आपल्या मुलांना अशा मांजा दोऱ्यांचा वापर न करण्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाच्या कार्याचे पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.








