बेळगाव लाईव्ह : दरवर्षीप्रमाणे यंदाही कित्तूर विजयोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव यावर्षी आदर्श पद्धतीने साजरा करण्याची योजना असून, लोकांनी सर्व कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी २३ ऑक्टोबरपासून सुरू होणारा कित्तूर उत्सव-२०२५ हा ‘आदर्श’ पद्धतीने साजरा करण्याची घोषणा केली. उत्सवाच्या पूर्वतयारी बैठकीत बोलताना, त्यांनी ५ कोटी अनुदानाची मागणी केली असल्याचे सांगितले. उत्सवात स्मारक सुधारणा, रोषणाई, स्थानिक कलाकारांना संधी यावर भर दिला जाईल. तसेच, राणी चन्नम्मा यांच्या जन्मस्थळाच्या भूसंपादनासाठी प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जनतेने उत्सवात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार बाबासाहेब पाटील यांनी कित्तूर उत्सवात वीर ज्योत मिरवणुकीतील चित्ररथांत बदल, विद्यार्थ्यांसाठी विशेष विचारसंवाद आणि कित्तूरच्या इतिहासाची पुस्तके प्रकाशित करण्याची योजना सांगितली. मागील वर्षी कमी संधी मिळाल्याने, या उत्सवात अधिक कलाकारांना आमंत्रित केले जाईल. तसेच, कित्तूरसाठी लवकरच नवीन बसेस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, गेल्या वर्षीही नागरिकांचे मत विचारात घेऊन समित्या तयार केल्या होत्या आणि ४ लाख लोकांनी उत्सवात सहभाग घेतला होता, ज्यामुळे उत्सव मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता. काकती येथील राणी चन्नम्मांचे घर इतरांच्या मालकीचे असल्याने थेट खरेदी करणे शक्य होत नाहीये. त्यामुळे कित्तूर प्राधिकरणाद्वारे भूसंपादन करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कित्तूर कल्लुमठाचे मडीवाळ राजयोगेंद्र महास्वामी यांनी राज्य सरकारने यावर्षी कित्तूर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे आणि लोकांनीही उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव दिमाखात होतो. गेल्या वर्षी उत्सवासाठी ५ कोटींचा निधी मिळाला होता आणि त्याच धर्तीवर २०२५ च्या उत्सवासाठीही ५ कोटी रुपयांचा निधी देण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
नागरिकांनी यावेळी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. वीरज्योत मागील वर्षाप्रमाणे राज्यभर फिरावी; उत्सवाच्या काळात गटार स्वच्छता, वीज आणि पिण्याचे पाणी यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा पुरवाव्यात. तसेच, उत्सवाची सर्व कामे निविदा काढून आणि बिले वेळेवर देऊन पारदर्शकपणे करावीत. कित्तूर बसस्थानकात तातडीने बससेवा सुरू करावी, रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेरे, कित्तूरची शासकीय कार्यालये तातडीने तालुक्यात स्थलांतरित करावीत, याशिवाय, कित्तूरच्या लढ्याचा इतिहास नव्या पिढीला समजावा यासाठी इतिहासाची माहिती असलेल्या साहित्यिकांना बोलवावे आणि उत्सवासाठी येणाऱ्या लोकांसाठी आजूबाजूच्या गावांमध्ये रस्ते रुंदीकरण व स्वच्छतेचे काम हाती घ्यावे, असेही सुचवण्यात आले.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते २०२५ च्या एस.एस.एल.सी. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, बायलहोंगल उपविभागीय अधिकारी प्रवीण जैन, कित्तूर तहसीलदार कलगाैडा पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.



