बेळगाव लाईव्ह : बसवतत्त्वांचा पुरस्कार करणाऱ्या लिंगायत मठाधीशांवर अपमानास्पद टीका केल्यामुळे, कोल्हापूर येथील कणेरी मठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्याविरुद्ध लिंगायत संघटनांनी बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात आंदोलन तीव्र केले आहे. याच अनुषंगाने, आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
जत तालुक्यातील बिळूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात कणेरी मठाचे स्वामीजींनी लिंगायत मठाधीशांवर टीकास्त्र सोडले होते. त्यांनी या मठाधिपतींच्या कार्याला ‘मुख्यमंत्री कृपापोषित नाट्या संघ’ अशा शब्दांत हिणवले होते. टीकेच्या भरात स्वामीजींच्या तोंडून काही अपशब्दही बाहेर पडल्यामुळे, कर्नाटकात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी येथे १६ व १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात कणेरी मठाधीश सहभागी होणार होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.
पोलीस दलाने दिलेल्या अहवालानंतर विजापूरचे जिल्हाधिकारी डॉ. आनंद के. यांनी तातडीने हस्तक्षेप करत स्वामीजींना जिल्ह्यात प्रवेशबंदी जाहीर केली आहे.

या पार्श्वभूमीवर, बेळगावातही आज आंदोलन करण्यात आले. अप्रिय घटना टाळण्यासाठी विजापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला प्रवेशबंदीचा निर्णय योग्यच असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले.


