बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार (अत्याचार) केल्याप्रकरणी बेळगावच्या जिल्हा पोक्सो न्यायालयाने आरोपी विठ्ठल सिद्धिंगप्पा कित्तूर (वय ३०, रा. बैलहोंगल) याला २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी कित्तूर याने १९-१०-२०१९ रोजी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला मंगळूर येथे डांबून ठेवले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले होते. जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने हा गुन्हा केला होता. बैलहोंगल पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
माननीय न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी ९ साक्षीदार आणि १२८ कागदपत्रे यांच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवले. तसेच, न्यायालयाने पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही भरपाईची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत ५ वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एल. व्ही. पाटील, विशेष सरकारी वकिलांनी यशस्वी युक्तिवाद केला.



