जागा हो मराठा!
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि जीवनशैलीतील आव्हानांवर विशेष लेखमालिका, अपेक्षांचा बोजा आणि उपेक्षेचा शाप!
जग वेगाने बदलत आहे. एकेकाळी १०० टक्के शेतीवर अवलंबून असणारा मराठा समाज आता आपला मोर्चा मोठ्या प्रमाणात व्यवसाय, नोकरी आणि इतर क्षेत्रांकडे वळवत आहे. विविध क्षेत्रांत आपले पाय रोवू पाहत असताना, नव्या क्षेत्रात प्रवेश करताना अनेक समस्या उभ्या राहतात. दुर्दैवाने, बेळगावच्या मराठा समाजालाही अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे आणि समाजाची प्रगती काही प्रमाणात खुंटल्याचे दिसत आहे. बेळगावच्या मराठा समाजाची अधोगतीकडे होणारी वाटचाल, याला नेमके कोण जबाबदार आहे? समाजासमोरच्या नेमक्या समस्या काय आहेत? या समाजाला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? या प्रश्नांचा वेध घेणे आज अत्यंत आवश्यक आहे.
‘जागा हो मराठा’ या विशेष लेखमालेतून आम्ही बेळगावच्या मराठा समाजाला भेडसावणाऱ्या या सर्व समस्यांवर प्रकाश टाकून, प्रगतीपथावर जाण्यासाठीचे ठोस उपाय आणि कृतीची दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बेळगाव लाईव्ह विशेष 5: बेळगावचा मराठा समाज सध्या एका मोठ्या सामाजिक पेचामध्ये अडकला आहे. शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीची नवी क्षितिजे दिसत असतानाच, विवाहासारख्या मूलभूत सामाजिक संस्थेमध्ये अभूतपूर्व अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणींमुळे समाजाच्या भविष्यावर आणि अस्तित्वावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अविवाहित तरुणांची वाढती संख्या, त्यातून निर्माण होणारी सामाजिक विसंगती आणि समाजाची घटती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. या समस्यांच्या मुळाशी मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या ‘अवास्तव अपेक्षा’ तसेच मुलांची ‘आर्थिक उपेक्षा’ ही दोन मुख्य कारणे आहेत.

आज मराठा समाजातील मुली आणि त्यांचे पालक मुलांकडून मोठ्या प्रमाणात भौतिक आणि आर्थिक स्थैर्याची मागणी करत आहेत. ‘वयाच्या २५ व्या वर्षी मुलगा पूर्णपणे सेटल हवा, त्याचे स्वतःचे घर-गाडी, परमनंट सरकारी किंवा उच्च पगाराची नोकरी हवी’ अशा मागण्या सर्रास केल्या जात आहेत. मुलाचे वडील भले ५० व्या वर्षी भाड्याच्या घरात राहत असतील, तरी मुलीच्या बापाला २५ वर्षांच्या मुलाकडून ही ‘सेटलमेंट’ त्वरित अपेक्षित आहे. हे अपेक्षांचे ओझे इतके मोठे झाले आहे की, विवाहेच्छुक तरुण आणि त्यांच्या कुटुंबाची अक्षरशः दमछाक होत आहे, कारण सामाजिक स्तर थोडा जरी कमी असला तरी मुलांच्या विवाहासाठी अनेक अडचणी येत आहेत. या विषम स्थितीमागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक तरुणांवर कुटुंबाची जबाबदारी लवकर पडत असल्याने ते १२ वी नंतर लगेच नोकरी किंवा मजुरीच्या कामाला लागतात, ज्यामुळे त्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता येत नाही. याउलट, आजकाल मुली पदवी, पदव्युत्तर पदवी घेऊन उच्चशिक्षण घेत आहेत. शिक्षणामध्ये मोठा फरक पडल्यामुळे, मुलींच्या अपेक्षा आणि मुलांची सामाजिक-आर्थिक स्थिती यात मोठी तफावत निर्माण होते आणि मुलांकडून या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने विवाह होणे अवघड बनले आहे.
मुलींच्या या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याने अनेक मुलांचे विवाह ३५-४० वर्षे उलटूनही होत नाहीत. याच ‘उपेक्षे’मुळे अनेक तरुणांमध्ये नैराश्य येते आणि काही जण व्यसनाधीनतेकडे वळतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. विवाह योग्य वेळेत न झाल्यास कुटुंब नियोजनही व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे समाजाची पुढची पिढी तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. जर अविवाहितांची ही संख्या अशीच वाढत राहिली, तर काही वर्षांनी मराठा समाजाची स्थिती पारसी समाजाप्रमाणे होऊ शकते, जिथे घटत्या लोकसंख्येमुळे समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पुढची पिढी जर योग्य प्रमाणात तयार झाली नाही, तर मराठा समाज हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर जाईल. या गंभीर समस्येचा परिणाम काही काळात मुलींवरही दिसून येईल, जेव्हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे ‘सेटल’ तरुण पुरेशा संख्येत उपलब्ध नसतील.
या गंभीर संकटातून बाहेर पडण्यासाठी समाजाला आपल्या विचारसरणीत कठोर बदल करणे गरजेचे आहे. प्रथम, मुलींनी सर्व काही ‘आयत्या’ पद्धतीने न पाहता, ‘स्व-कष्टावर’ काहीतरी साध्य करण्याचा आणि उभं करण्याचा मानस ठेवून, पतीला साथ देण्याची भूमिका घ्यावी. विवाह निश्चित करताना थोडीफार तडजोड करून, आपल्या अपेक्षा कमी कराव्यात आणि पतीच्या प्रगतीत सक्रिय भागीदार व्हावे. मुलींच्या अपेक्षांना ‘धरबंध’ घालणे, ही आजच्या समाजाची सर्वात मोठी आणि तातडीची गरज आहे. दुसरे म्हणजे, तरुणांनी केवळ मजुरीच्या किंवा कमी पगाराच्या नोकऱ्यांवर समाधान न मानता, कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण आणि आर्थिक नियोजनावर भर देऊन स्वयंनिर्भर व्हावे. ‘सेटलमेंट’ ही वयानुसार नव्हे, तर सातत्यपूर्ण प्रयत्नातून येते, हे लक्षात घेऊन स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी काम करावे. मुलांची होणारी ‘उपेक्षा’ थांबवण्यासाठी त्यांना सामाजिक आणि आर्थिक स्तरावर उभे करणे गरजेचे आहे. बेळगावच्या मराठा समाजात विवाहसंदर्भात असलेल्या या ‘अपेक्षा आणि उपेक्षा’ या दोन्हीवर विचारविनिमय करण्याची आणि सामूहिक कृती करण्याची हीच योग्य वेळ आहे…..क्रमशः






मराठा समाज हा नेहमीच ‘एकत्रित आणि लढवय्या’ म्हणून ओळखला गेला आहे. आज समाजासमोर उभे ठाकलेले हे संकट कोणत्याही युद्धाहून कमी नाही. जर हे चित्र पालटले नाही, तर आज जी परिस्थिती अविवाहित तरुणांची आहे, तीच परिस्थिती भविष्यात अवाढव्य अपेक्षांमुळे मुलींवर देखील येण्याची दाट शक्यता आहे. समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाने, पालकांनी, तरुणांनी आणि युवतींनी, आपल्या अपेक्षांचा पुनर्विचार करणे अत्यावश्यक आहे. मुलींनी अपेक्षा कमी करून सहकार्याची भूमिका घ्यावी आणि मुलांनी उपेक्षा बाजूला सारून स्वतःला सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम करावे. अपेक्षांचा हा बोजा आणि उपेक्षेचा हा शाप दूर करण्यासाठी एकजुटीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. केवळ वैयक्तिक सुख नव्हे, तर समाजाचे सामूहिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘तडजोड आणि स्वयंनिर्भरता’ हेच मराठा समाजाचे नवीन मंत्र असायला हवेत, हे तरुण पिढीने आता लक्षात घेणे गरजेचे आहे.



