बेळगाव लाईव्ह : सीमावर्ती बेळगाव शहरात ‘कर्नाटक राज्योत्सवा’च्या निमित्ताने कन्नड अस्मिता जपण्याच्या नावाखाली ‘सांस्कृतिक सक्ती’ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. येथील कर्नाटक रक्षण वेदिके (करवे) युवासेनेने जिल्हा प्रशासनावर दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.
बेळगाव शहर आणि उपनगरातील सर्व औद्योगिक वसाहती तसेच शॉपिंग मॉल्समध्ये येत्या १ नोव्हेंबर रोजी श्री भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेची पूजा करणे बंधनकारक करावे, अशी मागणी करत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ माजविला.
आज ‘करवे’ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सदर मागणीसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने केली. कन्नड अस्मितेच्या घोषणा देत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश जारी करावा, असा आग्रह धरला. नव्हेंबर १ रोजी औद्योगिक वसाहती आणि मॉल्समधील आस्थापनांनी श्री भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन सक्तीने करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आदेश काढावा.
हा आदेश जारी करण्यासाठी करवे युवासेनेने दबावतंत्राचा अवलंब केला असून, या कृतीमुळे सीमाभागात कन्नड भाषेचे आणि संस्कृतीचे वर्चस्व दाखवण्याचा हा आणखी एक प्रयत्न असल्याची चर्चा मराठी भाषिकांत तीव्र झाली आहे.





