बेळगाव लाईव्ह : राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि सूपर स्पेशालिटी रुग्णालय उपलब्ध करणे हा शासनाचा उद्देश आहे. यानुसार २२ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असून, उर्वरित ठिकाणीही ती लवकरच सुरू करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
शुक्रवारी बिम्स् परिसरात सूपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन, गृहवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वस्तीगृह बांधकामाची कोनशिला, स्मार्ट सिटी योजनेतील शहर बस स्थानक व राणी चन्नम्मा विश्वविद्यालयच्या इमारत कामांचे उद्घाटन आणि कोनशिला उद्घाटन करताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, बेळगावसह उत्तर कर्नाटकात अतिवृष्टीमुळे राज्यात दहा लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीच्या सर्वेक्षणानंतर भरपाई दिली जाईल. यानुसार पिकांसाठी राज्याचे आणि एन.डी.आर.एफ. मार्गदर्शक तत्त्वांनुसार असे एकूण १७ हजार भरपाई देण्यात येईल. बागायती पिकांच्या नुकसानीसाठी २१,५०० भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
सूपर स्पेशालिटी रुग्णालय गरिबांसाठी उद्देशून असून, येथे टप्प्याटप्प्याने वैद्यकीय कर्मचारी भरती केली जाईल. के.एल.ई. संस्थेने मोफत सेवा देण्यासाठी डॉक्टर नियुक्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
बेळगाव शहर बस स्थानक स्मार्ट सिटी योजनेतून बांधले आहे आणि शहरासाठी शंभर इलेक्ट्रिक बस लवकरच येतील. ‘शक्ती योजने’अंतर्गत आतापर्यंत ५६५ कोटी महिलांनी मोफत प्रवास केला आहे व यावर शासनाने १४,४५६ कोटी खर्च केले आहेत. गॅरंटी योजनांमुळे गरिबांना स्वयंपूर्ण करण्याची योजना आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी बोलताना म्हणाले, बिम्स परिसरात कॅन्सर रुग्णालय स्थापन केले जाईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ₹२०० कोटींचा फ्लाई ओवर, हुदलीत आर.ओ.बी., क्रीडांगण आणि ₹५५ कोटींचे जिल्हाधिकारी कार्यालय अशी विकासकामे सुरू आहेत.
वैद्यकीय शिक्षण मंत्री शरण प्रकाश पाटील बोलताना म्हणाले, बिम्स् सूपर स्पेशालिटी रुग्णालय हे गरीब रुग्णांसाठी ‘कामधेनू’ आहे. ५० कोटीच्या खर्चातून कॅन्सर रुग्णालय स्थापन होईल. देशात सर्वाधिक वैद्यकीय जागा कर्नाटकात आहेत आणि पुढील ५ वर्षांत प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय व ट्रॉमा केंद्र स्थापन करण्याची योजना आहे.
महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले, हे रुग्णालय बेळगावच्या गौरवात भर घालणारे आहे. सार्वजनिक संस्थांची स्वच्छता व रक्षण करण्याची जबाबदारी जनतेची आहे.
उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी.सुधाकर म्हणाले, राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. ₹९ कोटी खर्चातून हायवेपासून विश्वविद्यालयापर्यंत रस्ता बांधला जात आहे. ₹२५०० कोटी खर्चातून कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर विधानसभा आमदार आसिफ (राजू) सेठ होते. यावेळी के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



