बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मेंढपाळ ) समाजाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोठे आंदोलन उभे केले. वारंवार होणाऱ्या मेंढ्यांच्या चोरीवर कठोर कारवाई करावी, तसेच गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांना सोडणाऱ्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर आक्षेप घेतला. वर्षाला हजारो मेंढ्या चोरीला जात असतानाही प्रशासनाकडून संरक्षण मिळत नसल्याने समाजाने तीव्र संताप व्यक्त केला.
आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आलेल्या शेकडो मेंढपाळांनी आपल्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले की, रात्रीच्या वेळी चोरटे वाड्यांमध्ये घुसून मेंढ्यांची चोरी करत आहेत.
वर्षाला सुमारे ३ ते ४ हजार मेंढ्या गायब होत आहेत, पण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यास ते चोरीचा ‘पुरावा’ मागतात. चोरट्यांना पकडल्यानंतरही त्यांच्यावर कठोर कारवाई न होता, त्यांना सोडून दिले जात असल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे.
यावेळी मेंढपाळांनी शासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त करताना, अंतिम इशारा दिला. “डोंगरावर गेलो तर वन विभागाचे असहकार्य, आणि वस्तीत राहिल्यास चोरट्यांचा त्रास आहे. आम्हाला योग्य सुविधा आणि संरक्षण द्या.
अन्यथा, आम्ही आमच्या सर्व मेंढ्या व जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन ठाण मांडू, आणि मग प्रशासनानेच त्यांना चारा व आम्हाला जेवण पुरवावे,” असे आव्हान त्यांनी दिले. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.




