बेळगाव लाईव्ह : मटका जुगार आणि बेकायदा दारू विक्री प्रकरणी बेळगाव पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
बेळगावातील मास्तमर्डी गावातील कन्नड शाळेच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक ठिकाणी बेकायदा मटका जुगार खेळणाऱ्या तीन आरोपींना सीसीबी पोलीस ठाण्याचे पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून अटक केली.
अटक केलेल्या आरोपींमध्ये तारीहाळ येथील नागप्पा तम्माना गोलाई (५४), सुरेश सिद्धप्पा कोळकार (५०) आणि नामदेव यांचा समावेश आहे. या तीनही आरोपींकडून पोलिसांनी एकूण ६,०६०/- रुपये रोख रक्कम आणि अंदाजे ३,०००/- रुपये किमतीचा एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला. या तिन्ही आरोपींविरुद्ध मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि पुढील तपास चालू आहे.
याचप्रमाणे हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय चि. के. मिटगार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कोंडसकोप्प क्रॉसजवळ बेकायदा दारूची विक्री करणाऱ्या नागप्पा मारुती देमन्नवर (३२) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून १,७५०/- रुपये मूल्याच्या ३५ सॅशेमधील दारू आणि एक बॅग जप्त करण्यात आली. या आरोपीविरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि तपास चालू आहे.
या बेकायदा दारू विक्री आणि मागील मटका प्रकरणात मिळून पोलिसांनी एकूण १०,६१०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईबद्दल पीएसआय आणि कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.


