Saturday, December 6, 2025

/

त्या पतसंस्थांच्या ग्राहकांची जिल्हाधिकाऱ्याकडे धाव

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील खाजगी भाजी मार्केटच्या संचालकांकडून स्थापन करण्यात आलेल्या पाच प्रमुख सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा गैरव्यवहार झाल्याचा निषेध करत, फसवणूक झालेल्या ठेवीदार आणि शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत तीव्र आंदोलन केले. या संस्थांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बेळगाव शहरातील ‘बेलगाम डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल ग्रोव्हर्स सेलर्स परचेजर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.’, कामतगल्ली येथील ‘बेळगाव होलसेल व्हेजिटेबल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.’ या सहकारी संस्था आणि माधव रस्त्यावरील ‘कपिलनाथ क्रेडिट सौहार्द सोसायटी’ या पतसंस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या ठेवींची फसवणूक झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संस्थांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. जय किसान खासगी बाजारातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या ठेवीच्या रकमेचा गैरवापर केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

 belgaum

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जय किसान खासगी बाजारातील सोसायटी गेली दहा ते पंधरा वर्षांपासूनचे शेतकरी, व्यापारी आणि क्लार्क यांचे ठेवीचे पैसे परत करण्यासाठी टाळाटाळ करत आहे.” “या गरीब शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या पैशांची लूट झाली आहे. त्यांचे पैसे प्रामाणिकपणे परत मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा देऊ,” अशी ग्वाही त्यांनी ठेवीदारांना दिली. त्यांनी सर्व ठेवीदारांना कोणत्याही प्रकारची चिंता न करण्याचे आवाहनही केले.

यावेळी राजकुमार टोपण्णावर यांनी आंदोलकांना संबोधित केले. “बेलगाम डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल ग्रोव्हर्स सेलर्स परचेजर्स सहकारी संस्था, बेळगाव होलसेल व्हेजिटेबल मर्चंट्स मल्टिपर्पज सहकारी संस्था, तसेच कपिलनाथ क्रेडिट सौहार्द पतसंस्था, संकल्प क्रेडिट पतसंस्था आणि जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशन, यांनी शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.” “सर्व ठेवीदारांनी आवश्यक कागदपत्रे द्यावीत, आम्ही तुमच्या वतीने कायदेशीर लढा देऊ,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

या पाचही संस्थांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि फसवणूक झालेल्या ठेवीदारांचे पैसे परत करावेत, अशी मागणी आंदोलक शेतकरी आणि ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.