बेळगाव लाईव्ह : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूटफेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी दलित संघर्ष समिती (आंबेडकरवादी) बेळगावात आक्रमक झाली आहे. समितीच्या वतीने आज शहरात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्यावर बूटफेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोरच्या या कृत्याचा निषेध म्हणून, दलित संघर्ष समितीने बेळगावात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी राणी चन्नम्मा चौकात प्रतिकात्मक मृतदेहाचे दहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
महांतेश तळवार यांनी घटनेचा तीव्र निषेध करत, सरन्यायाधीश गवईंवर हल्ला करणाऱ्या वकील राकेश किशोरवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. “संविधानाने भारतात सर्वांना समान हक्क दिले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शशी साळवे यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला कायद्याचे राज्य चालवण्यासाठी जे अप्रतिम संविधान दिले, त्याचा हा अविवेकी व्यक्ती अपमान करत आहे. राकेश किशोरला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

दलित संघर्ष समितीचे कार्यकर्ते संतोष तळवळकर बोलताना म्हणाले, “संपूर्ण देशात दलित बांधवांना लक्ष्य केले जात आहे. दलित समाज इतके दिवस संयम पाळत आहे. पण, आता रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करण्याची वेळ शासनाने आणू नये,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
डी.एस.एस. आंबेडकरवादीचे राज्य कोषाध्यक्ष सिद्धप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात दीपक दब्बाळे, सागर कांबळे, फकीर तळवार, आनंद तळवळकर, नागेश कामशेट्टी यांच्यासह इतर दलित बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




