बेळगाव लाईव्ह :दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोनसाखळी हातोहात लांबवली.शनिवारी हिंदवाडी येथील नवोदय कॉलनीजवळील युद्ध स्मारकाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी शोभा मारुती होनगेकर (वय ६७, रा. नवोदय कॉलनी, हिंदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. याची किंमत १ लाख ८० हजार नोंदवली आहे.
शोभा होनगेकर या शनिवारी हिंदवाडीमधील नवोदय स्मारक गार्डनजवळून मुख्य रस्त्याने नवोदय कॉलनीकडे घरी चालत निघाल्या होत्या. यावेळी मागून चालत आलेल्या एका भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळीला हात घालत जोराने हिसडा मारला. सोनसाखळी घेऊन तो काही अंतरावर थांबलेल्या दुचाकीस्वार सहकाऱ्याकडे धावत जाऊन दोघेही भरधाव निघून गेले. वृद्धेने आरडाओरड करेपर्यंत दोघेही भामटे भरधाव निघून गेले. हे दोघेजण येथून आदर्श स्कूल रोडमार्गे पुढे निघून गेल्याचे वृद्ध महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच टिळकवाडीचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. भामटे गेलेल्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यांना लवकरच जेरबंद करण्याची ग्वाही पोलिसांनी दिली. निरीक्षक पुजेरी पुढील तपास करीत आहेत.



