बेळगाव लाईव्ह : खानापूरच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांना पक्षाने अत्यंत महत्त्वाचे संघटनात्मक पद बहाल केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्याची दखल घेत एआयसीसीने त्यांची आता तेलंगणा राज्याच्या अतिरिक्त प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.
डॉ. अंजली निंबाळकर सध्या गोवा यासह अनेक प्रमुख राज्यांच्या प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीतून काँग्रेस पक्षाच्या सर्व विभागांमध्ये नवा उत्साह निर्माण करून संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे.
त्यांच्या या प्रभावी कार्यपद्धतीने एआयसीसीचे लक्ष वेधून घेतले आहे. संघटनात्मक पातळीवर अत्यंत चाणाक्ष असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांना तेलंगणासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या प्रभारीपदी नेमून एआयसीसीने त्यांच्यावर राष्ट्रीय स्तरावर अधिक मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या पक्षाच्या संघटन कार्यक्षमतेला मिळालेली ही मोठी मान्यता आहे.
गोवा राज्य आणि दिव दमन राज्याच्या देखील त्यांनी काँग्रेस पक्षाचे सहभागी म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची निवड तेलंगणासारख्या राज्याची सहप्रभारी म्हणून करण्यात आली आहे या निवडीमुळे अंजली निंबाळकर यांचे दिल्लीतील वजन अधिक बळकट झाल्याचे बोलले जात आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारीबद्दल बोलताना डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, “खानापूरच्या जनतेच्या आशीर्वादामुळेच मला ही राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी मिळाली आहे.” तसेच, ही नवी जबाबदारी पार पाडताना खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समस्यांकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष न करता त्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



