बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी झू येथे “अक्का कॅफे” सुरू करण्याच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उप वनसंरक्षक, बेळगाव विभाग, क्रांती एन.ई. यांच्या उपस्थितीत आज जिल्हा पंचायत सभागृहात बैठक पार पडली.
सदर बैठकीत के.आर.आय.डी.एल. विभागामार्फत अक्का कॅफेच्या इमारतीच्या रचनेचा आराखडा आणि अंदाजित खर्चाच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी इमारतीच्या रचनेचा आराखडा तपासला. त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, इमारतीची रचना पर्यटकांना आकर्षित करणारी असावी, तसेच वन्य पर्यावरणाचे प्रतिबिंब दर्शवणारे इमारतीचे बांधकाम केले जावे.
त्यानंतर, संजीवनी ग्रामपंचायत स्तरावरील फेडरेशनच्या सदस्यांसोबत करारनामा करण्यासाठी त्यांनी बेळगाव तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रकल्प संचालक रवी बंगारप्पन्नवर यांच्याकडे सोपवण्यात आली. संजीवनी ग्रामपंचायत स्तरावरील फेडरेशनच्या अध्यक्ष आणि सदस्यांशी संवाद साधला. अक्का कॅफेचे व्यवस्थापन व्यवस्थित चालवण्यासाठी स्वयंसहाय्यता गटांमधून पात्र सदस्यांची निवड करावी आणि त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या सदस्यांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीत अक्का कॅफेचे व्यवस्थापन करणाऱ्या सदस्यांना प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा झाली. संजीवनी ग्रामपंचायत स्तरावरील फेडरेशनमधून निवड झालेल्या स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना व्यावसायिक हॉटेल व्यवस्थापनाचे योग्य प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या बैठकीला जिल्हा पंचायत अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


