बेळगाव लाईव्ह : बेळगावातील खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’ पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी शहरात भव्य आंदोलन केले. या आंदोलनाला हजारो शेतकरी, व्यापारी, हमाल, कामगार आणि टॅक्सी मालक सहभागी झाले होते. शहरातील वाहतूक आणि आंदोलनांचे केंद्रबिंदू असलेल्या राणी चन्नम्मा चौकात शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावरच पंगत मांडून जेवण केले. चौकाच्या इतिहासात असे अनोखे आंदोलन प्रथमच घडले आहे, ज्यामुळे हे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.
शहराच्या राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या जय किसान भाजी मार्केटपासून या मोर्चाला सुरुवात झाली. गांधीनगर ओव्हर ब्रिज सर्व्हिस रोडमार्गे पुढे जात शेकडो शेतकरी हातात जय किसान भाजी मार्केटच्या फलकांसह जोरदार घोषणा देत राणी चन्नम्मा चौकात पोहोचले. बेळगावसोबतच सौंदत्ती, कित्तूर, खानापूर आणि बैलहोंगल यांसारख्या विविध तालुक्यांमधील शेतकरी यात सहभागी झाले होते.
या ठिकाणी पोहोचल्यावर आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पालकमंत्र्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन न्याय द्यावा, अशी आग्रही भूमिका घेतली. ‘जोपर्यंत अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बेळगाव जिल्हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असल्यामुळे दोन भाजी मार्केटचा फायदा शेतकऱ्यांसाठीच होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच, ‘जय किसान भाजी मार्केट’मधील व्यापारी आणि जिल्ह्यातील शेतकरी यांच्यात सलोख्याचे संबंध असून हे मार्केट शेतकऱ्यांसाठी सोयीचे आहे, असेही ते म्हणाले. ‘केंद्र सरकारने खासगी भाजी मार्केट सुरू करण्यास परवानगी दिली असताना आणि मार्केटचे बांधकाम नियमानुसार झालेले असताना ही कारवाई का करण्यात आली?’ असा संतप्त सवालही शेतकरी नेत्यांनी उपस्थित केला.
यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनी शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. अखेरीस, खासदार इराण्णा कडाडी आणि संजय पाटील यांच्या समोर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, ‘जय किसान भाजी मार्केटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात किरकोळ खरेदी-विक्री सुरू करण्याची परवानगी दिली जाईल.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असून उद्या याबाबत सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीनंतरच घाऊक मार्केटबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.’ या आश्वासनानंतर शेतकरी काही प्रमाणात शांत झाले, परंतु ‘जय किसान भाजी मार्केटमध्ये घाऊक व्यापारालाही परवानगी द्यावी,’ या मागणीवर ते ठाम होते.

सकाळपासूनच आंदोलक शेतकरी चन्नम्मा चौकात ठाण मांडून बसले होते. दुपार झाली तरी कोणताही अधिकारी त्यांच्या भेटीला न आल्यामुळे आंदोलकांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी चक्क रस्त्यावरच जेवणाची तयारी केली आणि रांगेत बसून पंगत केली. भर रस्त्यात, वाहतुकीचे केंद्र असलेल्या या चौकात जगाच्या पोशिंद्यांनी जेवणाची पंगत मांडल्याने हा क्षण चौकाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय आणि चर्चेचा विषय ठरला.


