बेळगाव लाईव्ह :राज्याच्या पणन खात्याने व्यापारी परवाना रद्द करून जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटवर बंदी घातल्यामुळे बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) होलसेल भाजी मार्केट आज बुधवार सकाळपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. त्यामुळे हे भाजीमार्केट खरेदी-विक्रीच्या व्यवहाराने गजबजून गेलेले पहावयास मिळत आहे.
बेळगाव एपीएमसी येथील होलसेल भाजी मार्केट गेल्या 3 जानेवारी 2022 रोजी बंद झाले होते. आता राज्य सरकारच्या पणन खात्याने जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द केल्यामुळे या भाजी मार्केटला आज 17 सप्टेंबर 2025 पासून म्हणजे तब्बल सुमारे 3 वर्षे 8 महिन्यानंतर पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे.
काल मंगळवारी किरकोळ विक्रेत्यांनी आपल्या दुकानात विक्रीसाठी भाजी व्यवहार सुरू केला असला तरी आज बुधवारीपासून हे भाजी मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून पहाटेपासून बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून तसेच परगावाहून या ठिकाणी भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे.
भाजीपाला व अन्य कृषी उत्पादने भरून येणाऱ्या ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर वगैरे वाहनांचे एपीएमसी मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर एपीएमसी प्रशासन व शेतकरी नेत्यांकडून पुष्पहार घालून उस्फुर्त स्वागत करण्यात येत होते.
भाजी मार्केट आवारात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना एपीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेळगाव एपीएमसी भाजीपाला मार्केटचा आजच्या शुभारंभाच्या पहिल्या दिवसाची शेतकरी व व्यापाऱ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे अत्यंत समाधानकारक सुरुवात झाली आहे. परिणामी पूर्वी ज्या पद्धतीने हे भाजी मार्केट भरत होते त्या पद्धतीने ते भरू लागले असून आज जवळपास 75 ते 80 टक्के शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला आहे.
त्याचप्रमाणे या भाजी मार्केट मधील व्यापारी देखील शेतकऱ्यांची कृषी उत्पादने हिरीरीने स्वीकारून त्यांना योग्य दर देत आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी या ठिकाणी आवश्यक सर्व त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, दोन कॅन्टीन, शेतकऱ्यांना विसावा घेण्यासाठी रयत भवन, पार्किंगची जागा वगैरेंचा समावेश आहे.
या भाजी मार्केटच्या विशाल परिसरामुळे शेतकऱ्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालवाहू तसेच इतर वाहनांची कोंडी होणार नाही या पद्धतीने वाहतुकीची व पार्किंगची सोय करण्यात आली आहे. भाजी मार्केटमधील दुकानांचे गाळे ए, बी, सी, डी अशा चार इमारतींमध्ये विभागण्यात आले आहेत. या दुकान गाळ्यांपैकी 100 गाड्यांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले असून अद्याप 150 गाळे रिक्त आहेत. जे लवकरच इच्छुक व्यापाऱ्यांना दिले जातील असे सांगून गाळेधारक व्यापाऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा पुरवल्या जातील.
या खेरीज आज आलेल्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त उर्वरित शेतकरी व व्यापाऱ्यांना एपीएमसी भाजी मार्केटकडे परत आणून हे भाजी मार्केट पूर्वीपेक्षाही उत्तमरित्या सुरू राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, असे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
बेळगाव एपीएमसी भाजी मार्केट पूर्ववत सुरू व्हावे यासाठी सुमारे साडेतीन वर्षाहून अधिक काळाचा लढा देणाऱ्या येथील व्यापारी व शेतकऱ्यांनी बेळगाव लाईव्ह समोर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना हे भाजी मार्केट पुनश्च पूर्ण भरात सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सदर 3 वर्ष 8 महिन्यांचा कालावधी हा आमच्यासाठी एखाद्या वनवासाप्रमाणे होता. तथापि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने सर्व सोयी सुविधांसह उपलब्ध हे भाजी मार्केट पूर्ववत सुरू व्हावे यासाठी आम्ही कोर्टकचेऱ्या करत प्रशासनाविरुद्ध लढा दिला. सदर भाजी मार्केट आता पूर्ववत सुरू झाल्यामुळे आमच्या लढ्याला यश आले आहे. उशिरा का होईना शेवटी सत्याचा विजय होतो त्यानुसार आमचा व शेतकऱ्यांचा विजय झाला असून आज पहिल्या दिवशी या मार्केटमध्ये 90 टक्के माल आला आहे. त्याचप्रमाणे जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी देखील येथे येण्यास इच्छुक असून त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.




