बेळगाव लाईव्ह :बेळगावसह देशभरातील किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल ही शाळा यंदा 2025 मध्ये आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करत असून त्या अनुषंगाने नवी दिल्ली येथून काढण्यात आलेल्या कार रॅलीचे आज शुक्रवारी बेळगाव किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल येथे उत्साहपूर्ण जल्लोषी स्वागत करण्यात आले.
राष्ट्रीय लष्करी शाळा (आरएमएस) ज्याला पूर्वी किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेजेस आणि नंतर किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल म्हणून ओळखले जात आहे. ही शाळा यंदा 2025 मध्ये आपल्या स्थापनेची 100 गौरवशाली वर्षे साजरी करत आहेत.
या शताब्दी महोत्सवाचा एक भाग म्हणजे नवी दिल्ली येथून कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. एकता आणि सामायिक वारशाचे प्रतीक असलेली ही रॅली भारतातील सर्व पाच राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्सना भेट देणार असून जी आज शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी बेळगावात दाखल झाली आहे.
या रॅलीचे बेळगाव जॉर्जियन असोसिएशनने संवाद्य उस्फूर्त स्वागत केले. आता संध्याकाळी आरएमएस स्मृतिचिन्हांचे स्वागत, मान्यवरांची भाषणे आणि सहभागींसाठी रात्रीची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उद्या शनिवार दि. 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लष्करी शाळा बेळगावच्या विशेष सभा होणार असून त्यानंतर पुढे मार्गस्थ होण्यासाठी कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.
आरएमएस बेळगावचे प्राचार्य लेफ्टनंट कर्नल प्रभा बिष्ट आणि प्रशासकीय अधिकारी मेजर अक्षय सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरएमएस शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि बेळगाव जॉर्जियन असोसिएशनचे सदस्य पंकज महारिया, नवीन चौहान, साहिल काळे, मंजुनाथ बनशंकरी यांचे सहकार्य लाभणार आहे.

बेळगावच्या किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल या शाळेला देशासाठी योगदान देणाऱ्या आपल्या माजी प्रतिभावंत कर्तुत्ववान विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, देशाचे विद्यमान परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, भारतीय निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त अशोक लवासा, कल्याणी समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा समावेश आहे. देशात हिमाचल प्रदेशातील चैल, राजस्थान मधील अजमेर व धोलतूर, कर्नाटकातील बेंगलोर व बेळगाव अशा पाच ठिकाणी किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल अर्थात राष्ट्रीय मिलिटरी शाळा आहेत या शाळांकडून दर्जेदार शिक्षण, क्रीडा, शिस्त व देशप्रेम ही मूल्ये आजतागायत जपली जात आहेत हे विशेष होय.

