बेळगाव लाईव्ह : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकर महांतेश बुक्कानट्टी (२४) याचा खून केल्याच्या आरोपाखाली बसनवराज बुक्कानट्टी याला चिकोडी येथे अटक करण्यात आले आहे. आरोपी आपल्या पत्नीला मारण्याचा कट रचत असताना पोलिसांनी त्याला पकडले. ही घटना पोलिसांच्या समयसूचकतेमुळे उघडकीस आली असून, त्यांनी वेळीच कारवाई करून पत्नीचे प्राण वाचवले.
महांतेशचा खून केल्यानंतर बसनवराज आपल्या पत्नीचाही खून करण्याच्या तयारीत होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पुढील पाऊल उचलले आणि पत्नीचा जीव वाचवला. यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरे यांच्या सतर्कतेमुळेच हा प्रकार उघडकीस आला.
महांतेशच्या खुनाची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांना याची माहिती दिली. गुळेद यांनीही तातडीने चिकोडी पोलिसांना अक्षताच्या संरक्षणाबाबत सूचना दिल्या. एसपींच्या सूचनेनुसार, पोलिस जेव्हा अक्षताच्या घरासमोर पोहोचले, तेव्हा आरोपी बसनवराज तिथेच थांबलेला होता. त्याला पोलिसांनी जागेवरच अटक केली. पत्नीचा खून करण्यासाठी बसनवराज धारदार शस्त्रासोबत तिथे पोहोचला होता. यावेळी पोलिसांनी त्याला पकडून पत्नीचे प्राण वाचवले. या प्रकरणात आरोपी बसनवराज बुक्कानट्टी आणि विठ्ठल यांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी बसनवराज बुक्कानट्टी आणि अक्षताचे लग्न झाले होते. बसनवराज बेळगाव येथे फळांचा व्यवसाय करायचा आणि रोज हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर येथे ये-जा करत असे. महांतेश बुक्कानट्टी फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता आणि एका खासगी महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणूनही नोकरी करत होता. महांतेश हा बसनवराजचा दूरचा नातेवाईक असल्याने महांतेश आणि अक्षता यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. बसनवराज आणि अक्षताला एक मूलही आहे. तरीही, अक्षता आपल्या मुलाला शहाबंदर येथे सोडून महांतेशसोबत वेळ घालवत होती. गेल्या अनेक दिवसांपासून ती आपल्या मुलालाही भेटायला आली नव्हती.
या गोष्टीला कंटाळलेल्या बसनवराज बुक्कानट्टी याने महांतेशचा खून केला. त्यानंतर आपल्या मुलाला भेटण्यासाठी न आल्यामुळे तो अक्षताचाही खून करण्यासाठी चिकोडी येथे तिच्या माहेरी गेला होता. त्याचवेळी यमकनमर्डी सीपीआयच्या सतर्कतेमुळे आरोपी बसनवराजला अटक करण्यात यश आले आणि अक्षताचे प्राण वाचले.


