बेळगाव लाईव्ह : राज्यात सुरू असलेल्या जातीनिहाय जनगणना सर्वेक्षणामध्ये मराठा समाजाने कोणत्या प्रकारे नोंद करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जत्तीमठ येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये ‘धर्म: हिंदू, जात: मराठा, पोटजात: कुणबी, मातृभाषा: मराठी’ अशा नोंदी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हे सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण होणार आहे.
या बैठकीत बोलताना प्रकाश मरगाळे म्हणाले, “या सर्वेक्षणात ‘कुणबी’ असा उल्लेख केल्यास कोणताही गैरसमज होण्याचे कारण नाही. कोणत्याही निकषाची पर्वा न करता, सीमाभागातील मराठा समाजाने या सर्वेक्षणाच्या फॉर्ममध्ये हिंदू-मराठा-कुणबी-मराठी अशीच नोंद करावी. याचा फायदा आपल्या मुलांना भविष्यात नक्कीच होईल.”
सकल मराठा समाजाचे अध्यक्ष गुणवंत पाटील म्हणाले, “आरक्षण आणि शैक्षणिक फायदे मिळवण्यासाठी आपल्याला दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्वेक्षणात योग्य नोंदी करणे महत्त्वाचे आहे. समाजाच्या एकत्रीकरणासाठी ही बाब खूपच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जिथे जिथे मराठा समाज आहे, तेथील मराठा समाजबांधवांनी या नोंदींविषयी जनजागृती करावी.”
क्षत्रिय मराठा परिषद, बेळगावने आवाहन केले आहे की, ज्यांची सरकारी नोकरी आहे किंवा जे राजकारणात मोठे आहेत, तसेच कितीही उत्पन्न असूनही, प्रत्येकाने जातीच्या रकान्यात ‘कुणबी’ अशीच नोंद करावी. त्यानुसार, बेळगावमधील सकल मराठा समाजानेही याच प्रकारे नोंद करण्याचे आवाहन केले आहे. दररोज रंगूबाई पॅलेस येथे या संदर्भात बैठका घेऊन समाजात जनजागृती केली जाणार आहे. गुरुवारी मराठा मंदिरात याविषयी एक व्यापक बैठक होणार असून, यामध्ये समाजाला सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.
या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्वपक्षीय नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, जुने मतभेद बाजूला सारून एकत्र आले होते. समाजाच्या कल्याणासाठी राजकारण बाजूला सारून सर्वजण एकत्र येणे ही एक अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. सीमाभागातील मराठा समाज ज्या पद्धतीने विखुरला गेला आहे, त्याला एकत्र आणण्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी हे सर्व नेते अशाच प्रकारे एकजूट राहिल्यास मराठा समाज नक्कीच सर्व स्तरांवर चमकेल, यात शंका नाही. समाजाकडून या एकजुटीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
या बैठकीला रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण पाटील, शिवराज पाटील,नागेश देसाई, दत्ता जाधव, किरण जाधव, सुनील जाधव, रवी साळुंखे, नेताजी जाधव, सागर पाटील अनिल पाटील यांच्यासह मराठा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.



