बेळगाव लाईव्ह : शहरातील गांधीनगर येथे सुरू असलेल्या जय किसान खासगी मार्केटला जिल्हाधिकाऱ्यांनी टाळे ठोकण्याचे आदेश दिले आहेत. कृषी पणन विभागाने या मार्केटचा परवाना आधीच रद्द केला होता, तरीही येथे व्यापार सुरू असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे.
‘कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार व्यवहार अधिनियम, १९६६’ चे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, कृषी पणन विभागाच्या संचालकांनी १५ सप्टेंबर रोजी आदेश जारी करून जय किसान मार्केटचा ट्रेडिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला होता. हा परवाना बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप होता.या आदेशानंतरही मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी-विक्री सुरू होती, ज्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले होते. परवाना रद्द झाल्यानंतरही तेथे व्यापार सुरू ठेवणे ‘कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार व्यवहार (नियंत्रण आणि विकास) अधिनियम, १९६६’ च्या कलम ८ चे उल्लंघन आहे. त्यामुळे तातडीने पुढील कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती.
या विनंतीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केटमधील सर्व व्यवहार थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे ‘जय किसान’ खासगी मार्केटच्या मनमानी कारभारावर कायद्याचा अंकुश लागला असून, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण झाले आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.



