बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्हा न्यायालयासह न्यायालय आवारात अलीकडे एखाद्याची प्रकृती अचानक बिघडण्याचे प्रकार वारंवार घडत असून वेळीच उपचार न मिळाल्यामुळे काहींच्या जीवावर बेतले आहे. तेंव्हा यापुढे हे टाळण्यासाठी न्यायालय आवारात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक ताबडतोब नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी ॲड. श्यामसुंदर पत्तार आणि ॲड. मारुती कामान्नाचे यांनी बेळगाव बार असोसिएशनकडे केली आहे.
जिल्ह्याचे केंद्रस्थान असलेल्या बेळगाव जिल्हा न्यायालयाचे आवार वकील, त्यांचे अशील, आरोपी, पोलीस आणि साक्षीदार यांच्या गर्दीने नेहमी गजबजलेले असते. या गजबजलेल्या वातावरणात अलीकडे एखाद्याची प्रकृती अचानक बिघडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये जवळपास पाच जणांची प्रकृती अचानक बिघडून वेळेवर प्रथमोपचार न मिळाल्यामुळे परिस्थिती बिकट बनल्याचे प्रकार घडले आहेत. गंभीर बाब म्हणजे पाच पैकी दोघांच्या जिवावर बेतले आहे. ज्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावलेल्या ज्येष्ठ वकील पी. एस. पाटील यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालयामध्ये पती-पत्नी मधील दाव्याच्या सुनावणीप्रसंगी भोवळ येऊन खाली कोसळलेल्या पतीचे नंतर निधन झाले. काल न्यायालयात साक्ष देण्यास आलेला एक एमबीबीएस डॉक्टर खाली कोसळून गंभीर जखमी झाला.

याव्यतिरिक्त न्यायालय आवारातील झेरॉक्स सेंटरमध्ये वरून खाली पडल्याने एकाला गंभीर इजा झाली आहे. या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन वकीलवर्ग तसेच न्यायालयात येणाऱ्या लोकांच्या हितासाठी जिल्हा प्रशासनाला सांगून बेळगाव येथील वरच्या किंवा खालच्या न्यायालय आवारात रुग्णवाहिकेसह आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक युद्ध पातळीवर तैनात केले जावे, अशी मागणी ॲड. श्यामसुंदर पत्तार आणि ॲड. मारुती कामान्नाचे यांनी एका निवेदनाद्वारे बेळगाव बार असोसिएशनकडे केली आहे.
कोर्ट परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक शासकीय महत्त्वाची कार्यालय देखील आहेत याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज आंदोलने होत असतात हजारो लोकांची एज असते त्यामुळे अशा जनतेला देखील या आपातकालीन वैद्यकीय सेवांची मदत होऊ शकते जनतेला देखील ते सोयीचे ठरणार आहे त्यामुळे या ठिकाणी जिल्हा आरोग्य खात्याने लक्ष घालून वैद्यकीय पथक ॲम्बुलन्स सह नियुक्त करा अशी मागणी ही करण्यात आली आहे.


