बेळगाव लाईव्ह :खानापूर (जि. बेळगाव) तालुक्यातील कक्केरी गावामध्ये येत्या बुधवार दि. 1 आणि गुरुवार दि 2 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या श्री बिष्टम्मा देवीयात्रेप्रसंगी प्राणी अथवा पक्षांचे बळी देण्यावर बंदी घालण्यात आली असून तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
दरवर्षीप्रमाणे कक्केरी (ता. खानापूर, जि. बेळगाव) गावामध्ये येत्या 1 व 2 ऑक्टोबर 2025 रोजी श्री बिष्टम्मा देवी यात्रेसह आयुध पूजा आणि विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे. सदर यात्रेदरम्यान कोणत्याही प्राणी अथवा पक्षाचा बळी दिला जाऊ नये.
यासाठी तशा आशयाचा आदेश जारी करावा, अशी विनंती विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री दयानंद स्वामीजी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. कर्नाटक प्राणी बळी निषेध कायदा 1959 आणि नियम 1963 तसेच 1975 च्या कायद्यानुसार देवस्थानांच्या ठिकाणी देवाच्या नावावर प्राण्यांचा बळी देणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन आहे.
सदर कायदा व स्वामीजींच्या विनंतीची दखल घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी श्री बिष्टम्मा देवी यात्रेप्रसंगी देवस्थानाच्या आवारासह कक्केरी गावाच्या व्याप्तीत प्राणी अथवा पक्षांचा बळी देण्यावर बंदी असल्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे.
तसेच भाविकांनी आणि नागरिकांनी देवाच्या नावावर कोणत्याही प्राणी अथवा पक्षाचा बळी देऊ नये, असे आवाहन केले आहे.




