बेळगाव लाईव्ह: संस्थांच्या पैशांची सोय झाल्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव कागदी येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यामधील वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी कारखान्याच्या परिसरात झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आर. आय. पाटील होते
निधीअभावी मार्कंडेय सरकारी साखर कारखाना सुरू झाला नाही. कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. त्यामुळे कारखान्यात गुंतवणूक केलेल्या संस्थांची रक्कम दिल्यानंतर कारखाना भाडे तत्वावर देण्यात येईल, त्यामुळे संस्थांची रक्कम देण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांनी पुढाकार घ्यावा, असा ठराव झाला.
कारखान्याने मोलॅसिससाठी आगाऊ सात कोटी रुपये घेण्यात आले होते. पण कारखाना सुरू झाला नसल्यामुळे ती रक्कम परत करता आली नाही. त्यातून शेतकऱ्यांची बिले देण्यात आली. त्यामुळे कारखाना लीजवर देण्याआधी मोलॅसिसची रक्कमही अदा करण्याचा ठराव करण्यात आला.
तत्पूर्वी अध्यक्ष आर. आय. पाटील यांनी, कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. कारखान्यावर २०० कोटींहून अधिक कर्ज असताना आपण अध्यक्षपदाचा भार स्वीकारला. कारखान्याचा गाळप साधता यावा, यासाठी अनेक गुंतवणूकदारांकडे मदतीसाठी संचालक मंडळाने प्रयत्न केले. पण यश आले नाही. त्यामुळे केवळ निधीअभावी कारखान्याला गत गाळप हंगाम साधता आला नाही. हा कारखाना लीजवर देण्याची अनेकांची मागणी आहे. पण, या कारखान्यात परिसरातील अनेक सहकारी संस्थांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्या पैशांची तजबीज करण्याची ज्यांची तयारी आहे, त्यांनी कारखाना लीजवर घ्यावा. आम्ही एकाही शेतकऱ्याचे बील थकित ठेवलेले नाही. बँकांच्या व्याजापोटी मोठी रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्यास आणि ऊस तोड, वाहतुकीचे सुमारे एक कोटीचे बील थकीत आहे. पण, त्याआधी महाराष्ट्रातील ठेकेदाराला पैसे देवूनही तोडणी आणि वाहतुकीचे काम झालेले नाही. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. ते पैसे आले की आताच्या ठेकेदाराची रक्कम चुकती करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी, कारखाना चालवण्याइतपत पैसा संचालक मंडळाकडे नाही. त्यामुळे या कारखान्याच्या भविष्यासाठी कारखाना लीजवर देण्याची गरज आहे. लीजवर कारखाना दिला तरी सभासदांच्या अधिकारांवर काहीही परिणाम होत नाही. कारखाना वापराविना पडून राहणे दुखद आहे. त्यामुळे आपल्यातील मी पणा सोडून देवून सर्वांनी कारखान्याच्या हितासाठी काम करावे, असे आवाहन केले.
व्यवस्थापकिय संचालक झेबिउल्ला के. यांनी प्रास्ताविक करून कारखान्याची सद्यस्थिती कथन केली. सुरवातीला गणेश पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी संचालक मंडळ शेअर होल्डर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




