बेळगाव लाईव्ह :उद्योगांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टर येथे काल शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी (डीसी) संबंधित विभागांना निश्चित वेळेत समस्या सोडवण्याचे कडक निर्देश देऊन निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.
सदर बैठकीत औद्योगिक सुविधा, एक-खिडकी मंजुरी, सीएसआर निधी, कौशल्य विकास, पंतप्रधान विश्वकर्मा योजना आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम यावर सविस्तर चर्चा झाली. बेळगाव महानगरपालिकांच्या औद्योगिक क्षेत्रांबद्दलच्या उदासीनतेवर उपस्थित उद्योजकांनी तीव्र आक्षेप घेतला.
वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, पथदिव्यांची देखभाल योग्य नसणे, अयोग्य कचरा विल्हेवाट आणि तुंबलेली गटारे या त्यांच्या प्रमुख तक्रारी होत्या. या तक्रारींना उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना फीडर लाईन्स बदलण्याचे, आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आणि पथदिव्यांची योग्य देखभाल करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी कर वसुली सुरू करण्यापूर्वी कर्नाटक लघु उद्योग विकास महामंडळ स्टॉक यार्ड आणि कणबर्गी औद्योगिक वसाहत हस्तांतरण प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना बेळगाव उत्तरमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी जमीन निश्चित करण्याचे आणि होनगा औद्योगिक क्षेत्राजवळ अपघात रोखण्यासाठी गतिरोधक (हंप) बसवून आणि वाहने थेट महामार्गावर न जाता सर्व्हिस रोडवरून मार्गस्थ करण्याची सुधारणात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
कणगला औद्योगिक क्षेत्रासाठी एक अंडरपास देखील सुचवण्यात आला. ई-खाता समस्या आणि कर संबंधित समस्या सरकारी पातळीवर तातडीने सोडवल्या पाहिजेत यावर त्यांचा भर देताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपण दिलेल्या निर्देशांवरील प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी येत्या 15 सप्टेंबर रोजी पुन्हा आढावा बैठक आयोजित केली जाईल, असे घोषित केले.
बैठकीनंतर बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकणारे निवेदन सादर केले. ते स्वीकारून जिल्हाधिकारी रोशन यांनी आश्वासन दिले की सर्व तक्रारी वेळेवर सोडवल्या जातील. जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी औद्योगिक क्षेत्राच्या मध्यभागी फाउंड्री क्लस्टर येथे बैठक आयोजित केल्याबद्दल आणि उद्योगांच्या समस्यांना गांभीर्याने प्रतिसाद दिल्याबद्दल चेंबरने जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.


